

PNE26W19704 - सोलापूर : श्री शरणशिवलिंगेश्वर मठातील श्री रामलिंग चौडेश्वरी माता.
PNE26W19702 - गंडगा नृत्य सादर करताना देवीचा मुखवटा धारण केलेले मानकरी.
PNE26W19703 - कंगण बांधून स्तंभ स्थापना विधी करताना मंदिराचे पुजारी.
सात हजार घरांतून चौडेश्वरी मातेला पुरणपोळीचा नैवेद्य
इंदिरानगर व नीलमनगर मठात सोहळा; गंडगा नृत्याने यात्रोत्सवाला भक्तीचा साज
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : चौडेश्वरी मातेच्या चरणी सात हजार सुवासिनींकडून अर्पण करण्यात आलेला पुरणपोळीचा महानैवेद्य, संबळ-ढोलांच्या गजरात पार पडलेला सोहळा आणि देवीचा मुखवटा धारण करून सादर करण्यात आलेले पारंपरिक गंडगा नृत्य अशा भक्तिमय वातावरणात इंदिरानगर येथील श्री शरणशिवलिंगेश्वर मठ आणि नीलमनगर येथील श्री शरणलिंगेश्वर मठात चौडेश्वरी माता यात्रेचा दुसरा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यात्रोत्सवानिमित्त इंदिरानगर परिसरातील सुमारे पाच हजार, तर नीलमनगर परिसरातील दोन हजार घरांतून चौडेश्वरी मातेला पारंपरिक पुरणपोळीचा नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पण करण्यात आला.
इंदिरानगर येथील मठात सकाळी माता चौडेश्वरी देवी आणि श्री रामलिंग यांचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता पारंपरिक सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. यंदा ‘बाळबट्टल’चा मान नागेश सिंदगी यांना मिळाला. तसेच सोमशेखर नावदगी यांच्या घराण्यातील देवीचा मुखवटा धारण करण्याचा मान शिवशरण तुरबे यांना देण्यात आला. त्यांनी भगिनींसमवेत देवीचा मुखवटा परिधान करून श्री शरणशिवलिंगेश्वर मठासमोर कुंभ विधी पार पाडला.
---------------------------
कंगण बांधणे व स्तंभ स्थापना विधी
यात्रोत्सवातील अत्यंत पवित्र मानला जाणारा ‘कंगण बांधणे’ अथवा ‘स्तंभ स्थापना’ हा विधीही भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. कडुनिंब, आंबा आणि इतर पवित्र वृक्षांच्या फांद्या एकत्र बांधून त्यांना झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजविण्यात आले. मठासमोर उभारलेल्या या धार्मिक स्तंभाची विधिवत पूजा करण्यात आली. संपूर्ण यात्रोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी पुजारी आणि भाविकांनी सामूहिक प्रार्थना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.