पायाभूत सुविधांअभावी बाणेरवासिय त्रस्त 

baba.JPG
baba.JPG

पुणे ः गेल्या काही वर्षांपासून बाणेर-पाषाण लिंकरस्ता परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्‍यक त्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी येथील रहिवाशांकडून केल्या जात आहेत, मात्र महापालिका प्रशासनाकडून याची अजूनही गंभीरपणे दखल घेतली जात नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

या एकूण परिसरात जवळपास साठ मोठे गृहप्रकल्प असून यात दहा ते पंधरा हजार नागरिक राहतात, परंतु एवढ्या लोकसंख्येच्या या भागात काही प्रमाणात पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी बाग, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, क्रीडांगण, नागरी सुविधा केंद्र उपलब्ध करून देणे गरजेचे असताना यापैकी कशालाच महापालिकेने प्राधान्य दिलेले नाही. 

जेथे जेथे ऍमेनिटी स्पेसच्या नावाखाली जागा ताब्यात आलेल्या आहेत तेथे महापालिकेला हे करणे शक्‍य असतानाही आजपर्यंत यावर काहीच ठोस उपाययोजना झालेली नाही, याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. रिजेंट प्लाझा सोसायटीजवळ लोकवस्तीत असलेले कचरा विलगीकरण येथून हलवण्यात यावे, अशीही मागणी होत आहे. यामुळे दुर्गंधीसह या परिसराला विद्रुपता येत असल्याने व कामगारांच्या सोयीच्या दृष्टीने इतरत्र हलवण्यासाठीही येथील नागरिकांच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे, परंतु यास अद्याप तरी यश आलेले नाही. 

लिंक रस्ता ते पाषाण सूस रस्त्याला जोडणारा एकशे वीस फुटी रस्ताही अनेकदा आंदोलने करूनही पूर्णत्वास गेलेला नाही. तेथील जागा मालकांना विश्वासात घेऊन व त्यांच्या जागेचा योग्य मोबदला देऊन या जागा महापालिकेने ताब्यात घेऊन रस्त्याचे काम करणे आवश्‍यक आहे, परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याविषयी कुठलेही महत्त्वाचे पाऊल उचलले जात नाही. याविषयीही येथील जनतेत नाराजी आहे. 

रिजेंट प्लाझा ते बालाजी चौकापर्यंतचा बारा फुटांचा रस्ता अठरा फूट करण्यासाठी या मार्गावरील सोसायट्यांना विश्वासात घेऊन हे काम मार्गी लावावे, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे. याबाबत महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. एकशेवीस फुटी रस्ता व इतर सुविधांसाठी अनेकदा येथील नागरिकांनी आंदोलने करून अजूनही हे प्रश्न प्रलंबित आहेत. 

लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे पाठपुरावा करूनसुद्धा किरकोळ सोयी वगळता परिस्थितीत काहीच बदल घडत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. येथील जनतेच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने आता तरी ठोस भूमिका घ्यायला हवी अन्यथा पुन्हा आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढले जाईल, अशी भूमिका येथील नागरिकांनी मांडली आहे. 

""महापालिकेने पाणी, कचरा व्यवस्थापनसह येथील जागा मालकांना विश्वासात घेऊन रस्त्याचा मोठा प्रश्न सोडवावा, तसेच ऍमेनिटी स्पेसवर बाग, क्रीडांगण, नागरी सुविधा केंद्रासह विरंगुळा केंद्र बनवावे.'' 
- राजेंद्र चुत्तर, अध्यक्ष, बाणेर-पाषाण लिंक रोड वेल्फेअर ट्रस्ट 

------------------------------------- 

""या भागातील बालाजी चौक ते बादशाही हॉटेलपर्यंत चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या वाहन पार्किंगचा ज्वलंत विषय असून यावर वाहतूक पोलिसांकडून नियमित कारवाई केली जात नाही.'' - रवी सिन्हा, सचिव, बीपीएलआर वेल्फेअर ट्रस्ट 
-------------------------------------- 
""महापालिकेला वर्षाला सात ते दहा कोटींचा कर भरूनही नागरिकांना आवश्‍यक त्या प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. रस्ता, पुरेसे पाणी नाही, कचरा संकलनासारख्या मूलभूत प्रश्नांना अजूनही सामोरे जावे लागत आहे.'' - सीमा अगरवाल, स्थानिक रहिवासी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com