औंध पोस्टऑफिसमध्ये पाणी गळती; लेखी निवेदनानंतरही पालिकेकडून हालचाल नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

पालिकेच्या औंध क्षेत्रिय कार्यालयाच्या शेजारी असलेले हे कार्यालय भाडे तत्वावर असून पालिकेला या पाणीगळतीबाबत टपाल कार्यालयाकडून १८ नोव्हेंबर रोजी लेखी कळवण्यात आले होते.

औंध : येथील टपाल कार्यालयाच्या आतील बाजूस आणि मुख्य प्रवेशद्वारात वरच्या बाजूने पाणी गळती होत असल्याने नागरिकांना भिजतच आत प्रवेश करावा लागत आहे. यामुळे टपाल कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच येथे येणाऱ्या नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कार्यालयाच्या भिंतीवर आणि बाजूला पाणीगळती बरोबरच झाडांची वाढ होत असल्याने भिंतीला तडे जाऊन नुकसान होत आहे. यामुळे भिंतीचे नुकसान होऊन अपघातासह भविष्यात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे धोकाही निर्माण होऊ शकतो. पाणीगळतीमुळे कार्यालयातील भिंती खराब होत आहेत तरी याची दुरूस्ती करण्याची मागणी टपाल कार्यालयाकडून पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

पुणे नाही, तर कोल्हापूरचे पदवीधर ठरविणार आमदार; चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला!

पालिकेच्या औंध क्षेत्रिय कार्यालयाच्या शेजारी असलेले हे कार्यालय भाडे तत्वावर असून पालिकेला या पाणीगळतीबाबत टपाल कार्यालयाकडून १८ नोव्हेंबर रोजी लेखी कळवण्यात आले होते; परंतु अद्याप कोणतीही हालचाल पालिकेकडून करण्यात आलेली नसल्याचे टपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले. येथे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक, महिला कामानिमित्त येत असतात. त्यांना या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने काही ज्येष्ठ नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. 

पाण्याची गळती थेट दारातच होत असल्याने टपाल कार्यालयात येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा पाय घसरून पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या पाणीगळतीबाबत पालिकेकडून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांना याविषयी विचारले असता पाहणी करून दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले.

'कर्जफेड न करणाऱ्या थकबाकीदारांची नावे उघड करण्यास युनियन बँकेचा नकार'

एखाद्याच्या वैयक्तिक मिळकतीमध्ये पाणी गळती होत असेल, तर पालिकेकडून दंड आकारण्यात येतो; परंतु  या असुविधेविषयी पालिका मात्र दुर्लक्ष करत आहे. हे पाणी नेमके कुठून येत आहे याचीही माहिती नाही. कदाचित हे पाणी शौचालयातून गळती होणारेही असू शकते. त्यामुळे ही पाणी गळती लवकर बंद करावी आणि नागरिकांना किमान चांगला रस्ता तरी उपलब्ध करून द्यावा.
- सुधीर किरवे, स्थानिक  नागरीक, औंध

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens and staff are being inconvenienced due to water leakage at Aundh Post Office