इतका गंभीर गुन्हा आम्ही केला आहे काय? लॉकडाऊनमध्ये संचारबंदी भंग कारवाईवर नागरिक संतापले

Citizens angry over curfew violation action in lockdown Pune Police
Citizens angry over curfew violation action in lockdown Pune Police

पुणे : लॉकडाऊनमध्ये संचार मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या नागरिकांना काही दिवसांपासून पोलिसांकडुन घरोघरी जाऊन समजपत्रे बजावण्यास सुरूवात झाली आहे. एरवी चोरी, जबरी चोरी, घरफोडी, खुन किंवा अन्य गंभीर गुन्हे दाखल करणे किंवा त्यांचा तपास करण्यात जितकी तत्परता दाखविली जात नाही, तितकी तत्परता समजपत्रे बजावण्यासाठी का ? इतका गंभीर गुन्हा आम्ही केला आहे काय ? असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे अशा कारवाईसाठी पोलिस व न्यायव्यवस्थेवर ताण निर्माण करणे कितपत योग्य आहे, असा टोमणाही नागरीकांनी लगावला आहे.

लॉकडाऊनमध्ये संचार मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांना समजपत्र देण्याचे काम सुरू आहे, एरंडवणे भागातील नागरीकांच्या घरी जाऊन पोलिसांकडून समजपत्रे बजावली जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली. लॉकडाऊनमध्ये नागरिकांना विशिष्ट वेळेत संचार करण्यास तसेच ठराविक वेळेत खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, नागरीकांकडुन दळण, किराणा माल तसेच जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करताना त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असे. तसेच खरेदीसाठीची वेळ संपल्यानंतर लगेचच पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात असे. याबरोबरच विना मास्क विना प्रयोजन संचार, मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेने प्रवासी वाहतुक करणे, दुकानदारांकडून पी वन, पी टु नियमांचे पालन न करणे, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गर्दी करणे अशा कारणांसाठीही कारवाई करण्यात आली होती. अशा नागरिकांना आता पोलिसांकडून समजपत्र बजावण्यास सुरुवात झाली आहे.तसेच समजपत्राद्वारे त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांना समजपत्र बजावुन न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे. ज्या दिवशी न्यायालयातून दूरध्वनी येईल, त्या दिवशी नागरिकांनी उपस्थित राहावे. समजपत्र बजावण्यामागे नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी पूर्वकल्पना देण्यात येत आहे. न्यायालयात दंड भरून संबंधित प्रकरणातून ते मोकळे होतील, असे सांगत पोलिसांनी समजपत्र बजावण्याच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

सर्वसामान्य नागरीकांवर होणारे परिणाम
- पोलिस समजपत्र घेऊन घरोघरी येत असल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण
- पोलिस घरी आल्याने शेजाऱ्यांमध्ये ऊलट-सुलट चर्चा
- कागदपत्रे, छायाचित्रे मागितली जात असल्याने गंभीर गुन्हा केल्याची नागरीकांमध्ये भावना
- पोलिसांकडून नागरिकांना विनाकारण मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी

"किराणा माल खरेदी करुन घरी येताना उशीर झाला. त्यावेळी संचार मनाई आदेशाचा भंग केला म्हणून पोलिसांनी नाव, पत्ता लिहून घेत कलम 188 नुसार कारवाई केल्याचे सांगितले होते. आता समजपत्र बजावले आहे. आम्ही कुठला गंभीर गुन्हा केला कळत नाही. या प्रकारामुळे मानसिक त्रास होत आहे.'' संजय आहेर. नागरीक.

"कोरोनामध्ये वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना अडवून पोलिस त्यांचे नाव, पत्ता लिहून घेत होते. आता त्याच नागरीकांवर खटले दाखल करीत आहेत. त्यासाठी पोलिस कर्मचारी घरोघरी पाठवून छायाचित्र, ओळखपत्र गोळा केले जात आहेत. शहरातील गंभीर गुन्ह्यांचा तपास कदाचित पूर्ण झाला असेल, त्यामुळे पोलिसांकडून या अतिगंभीर गुन्ह्याच्या तपासाकडे लक्ष दिले जात आहे. हा सर्व प्रकार सर्वसामान्यांना नाहक त्रास देण्यासाठी आहे.''
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरीक मंच.

"नागरीकांना लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे. आता लॉकडाऊनमधील संचार मनाई आदेश भंग केल्याप्रकरणी नागरीकांना समजपत्रे बजावली जात आहेत. ती कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र नागरीकांना नव्याने त्रास देण्याचा कारवाईचा हेतू नाही. लोकांना दिलासा कसा मिळेल, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत.''
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.

लॉकडाऊनमधील कारवाई
- कारवाई झालेल्या नागरीकांची संख्या - 28 हजार 304
- पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांची संख्या - 35 हजार

शिक्षेचे स्वरुप - भारतीय दंड संहिता कलम 188 या कलमाचा भंग केल्यास एक महिना तुरूंगवास व दोनशे रुपये दंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com