चित्रपटगृहात जाण्यास नागरिकांची तयारी पण....

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

विकास हे एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. एरवी एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो विषय, कलाकार आपल्या पसंतीस उतरला की ते आवर्जून चित्रपट पहायला जातात.

पुणे, : "कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणणे आणि त्याचा प्रादुर्भाव रोखणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. परंतु सरकारने येत्या काही दिवसांत चित्रपटगृह सुरू केल्यास सोशल डिस्टंन्सिंग, निर्जतुकीकरण अशी काळजी घेतल्यास चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यास काही हरकत नसेल," असे विकास वानखेडे यांचे म्हणणे आहे.

विकास हे एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. एरवी एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो विषय, कलाकार आपल्या पसंतीस उतरला की ते आवर्जून चित्रपट पहायला जातात. परंतु गेल्या सात महिन्यात कोरोनामुळे चित्रपटगृह बंद असल्यामुळे विकाससारख्या अनेक चित्रपट रसिकांची निराशा झाली आहे. मात्र राज्यात संपूर्णपणे अनलॉक होत असताना, चित्रपटगृह सुरू व्हावीत का, यावर चर्चा सुरू आहे. अशात विकास यांच्यासारखे जवळपास सात टक्के नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेतल्यास चित्रपटगृहात जाण्याची तयारी दर्शविली आहे.

दिवाळी म्हटलं की दरवर्षी बिग बजेट चित्रपटांचा बफर धमाका असतो. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या सात महिन्यांपासून चित्रपटगृहांना कुलुप असून अद्याप ते उघडलेले नाही. असे असले तरी 'लोकल सर्कल्स'च्या सर्वेक्षणात येत्या काही दिवसांत चित्रपटगृह खुली झाल्यास जवळपास सात टक्के नागरिकांनी चित्रपटगृहात जाण्यासाठी होकार दर्शविला आहे. या सर्वेक्षणात जवळपास आठ हजार २७४ नागरिकांनी आपला प्रतिसाद नोंदविला आहे. 

 

सर्वेक्षणातील काही महत्त्वाचे मुद्दे :

चित्रपटगृहे सुरू झाल्यास तुम्ही येत्या ६० दिवसांत चित्रपट पहायला जाणार का?
- नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यास नक्की जाणार : ७ टक्के
- आम्ही जाणार नाही : ७४ टक्के
- सांगता येत नाही : २ टक्के
- चित्रपटगृहात जात नाही : १७ टक्के.

चित्रपटगृहात जाण्याबाबत गेल्या काही महिन्यात नागरिकांची मते :
नागरिकांचे मत : जुलै २०२० : ऑगस्ट २०२० : ऑक्टोबर २०२०
- चित्रपटगृहात जाण्याची तयारी दर्शविणारे नागरिक : ६ टक्के : ६ टक्के : ७ टक्के
- नकार देणारे नागरिक : ७२ टक्के : ७७ टक्के : ७४ टक्के
- सांगता येत नाही म्हणणारे : ४ टक्के : ३ टक्के : २ टक्के
- चित्रपटगृहात न जाणारे : १८ टक्के : १४ टक्के : १७ टक्के

चित्रपटगृहाची सद्यस्थिती
- चित्रपटगृह सुरू असलेली राज्ये : दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक
- चित्रपटगृह सुरू नसलेली राज्ये : महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, छत्तीसगड आणि ईशान्यकडील काही राज्ये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens are ready to go to the cinema if they are careful enough