बारामती शहरात लॉकडाउनचे तीन-तेरा अन्...

मिलिंद संगई
Tuesday, 15 September 2020

शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन केलेले असले तरी ते फक्त कागदावरच राहिलेले आहे. व्यापा-यांनी प्रामाणिकपणे दुकाने बंद ठेवून या लॉकडाऊनला सहकार्य केलेले असले तरी अनेक उत्साही बारामतीकरांना मात्र कोरोना संपला असेच वाटू लागल्याचे चित्र बारामतीत दिसत आहे.

बारामती : शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन केलेले असले तरी ते फक्त कागदावरच राहिलेले आहे. व्यापा-यांनी प्रामाणिकपणे दुकाने बंद ठेवून या लॉकडाऊनला सहकार्य केलेले असले तरी अनेक उत्साही बारामतीकरांना मात्र कोरोना संपला असेच वाटू लागल्याचे चित्र बारामतीत दिसत आहे. विनाकारण घराबाहेर पडून स्वताःसोबतच इतरांनाही धोका निर्माण करण्याची अनेक बारामतीकरांमध्ये चढाओढ लागली की काय अशीच स्थिती शहरातील रस्ते पाहून आज दिसत होती.

व्यापारपेठ बंद असल्याने खरेदीसाठी गर्दी नसली तरी रस्त्यावर असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची संख्या पाहून शहरात खऱच लॉकडाऊन सुरु आहे का, असा प्रश्न आज पडत होता. पानगल्ली ते मळद फाटा रस्त्याचे काम सुरु असल्याने येथे तर वाहतूकीची अनेक तास कोंडी होत होती. या रस्त्यावरील विविध वाहनांची गर्दी पाहून अनेकांना धडकी भरत होती. 

शहरातील अनेक रस्ते पोलिसांनी बंद केलेले असले तरी हुशार बारामतीकरांनी पर्यायी रस्ते शोधून काढत तेथून ये जा सुरु ठेवली आहे. लॉकडाऊन हा आपल्याच आरोग्यासाठी केल्याचा विसर अनेकांना पडल्याचे आज दिसत होते. अनेक ठिकाणी पोलिस लोकांना अडवत होते पण आपण अत्यावश्यक सेवेत कसे आहोत, स्वॅब द्यायला जायचे आहे इथपासून ते नातेवाईकांना डबा द्यायचा आहे, दवाखान्यात जायचे आहे, नातेवाईक आजारी आहेत अशी असंख्य कारणे पोलिसांना लोक सांगताना दिसत होते. 

या लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी बळाचा वापर टाळल्याने आता लोकांना कसली भीतीच उरलेली नसल्याचे आज जाणवले. काही ठिकाणी काही व्यापा-यांनी लॉकडाऊन झुगारून दुकानेही सुरु ठेवल्याचे दिसत होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens in Baramati do not follow the lockdown