अजित पवारांना कोणते पद मिळणार? बारामतीकरांना उत्सुकता

मिलिंद संगई
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

गेले काही दिवस सातत्याने घडणाऱ्या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार का येथपासून ते अजित पवार यांना कोणती संधी मिळते या कडेच बारामतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

बारामती : सत्ता स्थापनेच्या हालचाली मुंबईत वेगाने घडत असताना इकडे बारामतीकरांची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. गेले काही दिवस सातत्याने घडणाऱ्या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार का येथपासून ते अजित पवार यांना कोणती संधी मिळते या कडेच बारामतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत बारामतीकरांनी अजित पवार यांना तब्बल 1 लाख 65 हजारांच्या मताधिक्याने विजयी करतानाच विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याची किमया घडवून दाखवली. परिवर्तनाची भाषा करणा-या विरोधकांचा अजित पवार यांनी दारुण पराभव करत मतदारसंघावरील आपली पकड किती मजबूत आहे, हेच दाखवून दिले. 
बारामतीकरांनीही मुख्यमंत्र्यांपासून ते पालकमंत्र्यांपर्यंत अनेकांनी केलेल्या आवाहनाला बाजूला सारत अजित पवार यांच्यावरच विश्वास दाखविला. निवडणूकीपूर्वी तर कॉंग्रेस राष्ट्रवादीचे पानिपत होईल, अशीच हवा होती. तरिही बारामतीकरांनी पूर्वापार परंपरेनुसार अजित पवारांच्याच पारड्यात माप टाकले. 

निवडणूक निकालानंतर सगळीच गणिते बदलली व आता शिवसेना राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
या नवीन मंत्रीमंडळात अर्थातच राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते असलेल्या अजित पवार यांच्यावर महत्वाची जबाबदारी असणार हे निश्चित आहे. सत्तासमीकरणात राष्ट्रवादीच्या वाट्याला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद येते का आणि अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार होते का, याचीच आता बारामतीत कमालीची उत्सुकता आहे. 

अजित पवार यांनी राज्यमंत्रीपदापासून सुरु केलेला प्रवास उपमुख्यमंत्रीपदापर्यंत आलेला आहे. आता राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी त्यांच्यावर यावी अशी बारामतीकरांची इच्छा आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेने अडीच अडीच वर्षांचा दोन मुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला मान्य केला तर अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न दूर नाही, हे निश्चित आहे. 

अर्थात अजित पवार यांचे स्थान मंत्रीमंडळात महत्वाचेच असेल या बाबत बारामतीकरांच्या मनात शंका नसून, गेल्या पाच वर्षात विरोधात असल्याने बारामतीच्या विकासावर त्याचा जो परिणाम झाला होता, तो अनुशेष अजित पवार निश्चित भरुन काढतील, असा बारामतीकरांना विश्वास वाटतो. 

बारामतीसाठी भरभरुन काम करतील अजित पवार...
राज्यात विक्रमी मताधिक्याने ज्या बारामतीकरांनी विजयी केले, त्या बारामतीकरांसाठी सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार जिवाचे रान करतील, असा विश्वास मतदारांनाही वाटतो आहे. आजवर त्यांनी बारामतीच्या विकासाच्या प्रक्रीयेसाठी दिलेले योगदान विचारात घेता अजित पवार बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी निश्चित भरीव कामगिरी करुन दाखवतिल असे लोक बोलून दाखवित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens of Baramati excited for Ajit Pawar post