
पुण्यातील एकवीस वर्षांपूर्वीची घटना. राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेवर. देशातील आघाडी सरकार कोसळलेले. पुण्यात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात होते. तत्कालिन खासदार सुरेश कलमाडी यांनी काँग्रेस सोडून पुणे विकास आघाडी स्थापण्याची घोषणा केली होती. ते भाजपकडून लढणार की अपक्ष म्हणून तेही पुरते स्पष्ट झाले नव्हते. अशा वेळी भाजप प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीची तारीख चार जानेवारी 1998. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शरद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन. "भाजपच्या पुण्यातील कार्यकर्त्यांना पक्षासाठी मोठा त्याग करण्याची संधी मिळणार आहे,'' असे त्यांनी सुतोवाच करताच पक्षाचा कलमाडी यांना पाठिंबा असल्याचे सूचित झाले. ते म्हणाले, "अनेक कार्यकर्त्यांच्या त्यागातूनच भाजप उभा राहिला आहे. पुणे शहरातील कार्यकर्त्यांनाही आता त्याग करण्याची संधी मिळाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून तेच निवडणूक लढवित आहेत, असे समजून कार्यकर्त्यांनी काम करावे.''
'सकाळ'मध्ये त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या या Exclusive बातमीवर पुण्यात पक्ष कार्यकर्त्यांत प्रतिक्रिया उमटल्या, राज्यातही त्याचे पडसाद उमटले. कार्यकर्त्यांनी विरोध केला. शेवटी भाजपने कलमाडी यांना पाठिंबा दिला. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी त्यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल केली. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक गट त्यांच्या पाठिशी उभा राहिला. कलमाडी पराभूत झाले. हा झाला इतिहास.
दोन दशकांपूर्वी घडलेल्या या घटनेत आणि आताच्या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली जाते. त्यावेळी सत्ता नव्हती, आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचीच सत्ता आहे, तरी कार्यकर्त्यांना त्याग करण्याची संधी कायम मिळतच आहे.
जेथे पक्षाकडे सक्षम कार्यकर्ते नाहीत, तेथे अन्य पक्षातील सक्षम उमेदवारांना पक्षात घेण्यात येत असल्याचे पाच वर्षांपूर्वी फडणवीस यांच्यासह पक्षाचे अन्य नेते सांगत असत. आता निवडून येण्याची क्षमता हा निकष ठेवून अन्य पक्षांतील आयारामांना पक्षात स्थान दिले जात आहे. त्यातच गेल्या वेळी युती नसल्याने सर्व मतदारसंघांत लढता आले. आता शिवसेनेबरोबर युती झाल्यास, सव्वाशे मतदारसंघांत संधीच नाही. पण राज्यात सत्ता यावी, यासाठी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना संधीच संधी - त्याग करण्याची.
बाहेरच्यांसाठी त्याग. आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसाठीही त्याग करण्याची संधी कोथरुडमधील कार्यकर्त्यांना मिळणार आहे. आधीच युती होताना 1990ला शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार यांना जागा न सोडल्यास, युती तोडण्याची धमकी शिवसेनेने दिल्याने, दोनदा निवडून आलेले तत्कालिन आमदार अण्णा जोशी यांना कसबा पेठेत स्थलांतरीत व्हावे लागले. त्यानंतर 25 वर्षे युतीमुळे शिवसेनेचे आमदार होते. गेल्या वेळी युती तुटल्यावर, भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचा पराभव केला. कोथरुड हा भाजपचा बालेकिल्ला झाला. कुलकर्णी की नगरसेवक मुरलीधर मोहोळ अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झालेली.
पण, इतिहासाची आता पुनरावृत्ती होत आहे. कोथरुडच्या कार्यकर्त्यांना आता पुन्हा त्याग करण्याची संधी मिळणार आहे, ती बाहेरच्यांसाठी नाही, तर प्रदेशाध्यक्षासाठी. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट खासदार झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. ते आता कोथरूड या सेफ मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. उमेदवारी जाहीर झाली नसली, तरी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी याला दुजोरा दिला आहे. पाटील कोल्हापूरचे. पण शिवसेनेने कोल्हापूरातील दहापैकी आठ जागांवर उमेदवार जाहीर केले. त्यामुळे, पाटील यांना कोल्हापुरात सेफ मतदारसंघ नाही. त्यामुळे त्यांना पुण्यात स्थलांतरीत व्हावे लागले.
आणखी एक आठवण म्हणजे कोथरुडचे रहिवासी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पूर्वी दोनदा पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. तिसऱ्या वेळी त्यांचा पराभव झाला. तोही केला पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी. अशी त्यावेळची चर्चा. त्यानंतर, तो मतदारसंघ मिळाला, चंद्रकांत पाटील यांना. ते या मतदारसंघातून दोनदा निवडून आले. त्यांची मुदत पुढील वर्षी संपणार आहे.
पक्षातील कार्यकर्ते नाराज होत असले, तरी त्यांना समजावून सांगण्यात येत आहे. मेधा कुलकर्णी काल रात्रीच मुंबईतील पक्ष कार्यालयात दाखल झाल्या होत्या. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नाराज कार्यकर्ते येत असतात, त्यांची समजूत काढली जाते, असे पाटील यांनी काल मुंबईत पत्रकारांना सांगितले. समजूत निघाल्यानंतर कार्यकर्ते त्याग करण्याची परंपरा कायम ठेवतात, अन् पक्षाच्या "कमळ' चिन्हावर उभारलेल्या अथवा मित्र पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू लागतात. काहीजण बंडखोरीचा प्रयत्न करतात, पण भाजपच्या संस्कारात बंडाचा स्थान नाही. निरपेक्ष भावनेने पक्ष कार्य करण्याचे संस्कारच शेवटी महत्त्वाचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.