esakal | पुणेकरांनो, हा आलेख सांगतोय...पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे
sakal

बोलून बातमी शोधा

graph

पुण्यात नव्या रुग्णांची संख्या येत्या दोन आठवड्यात घटण्याची शक्‍यता दिसू लागली आहे. 

पुणेकरांनो, हा आलेख सांगतोय...पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणेकरांनो, पुढचे पंधरा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेल्या पुण्यात नव्या रुग्णांची संख्या येत्या दोन आठवड्यात घटण्याची शक्‍यता दिसू लागली आहे. कोरोना आटोक्‍यात आला, असा याचा अर्थ नाही...मात्र गेले दोन महिने सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील लढाईतील हे महत्त्वाचे यश असणार आहे. 

ओझोनच्या वापरातून कोरोना विषाणू नष्ट केला जाऊ शकतो?

पुण्यामध्ये नऊ मार्चला पहिला रुग्ण मिळाला. त्यानंतरच्या दोन महिन्यात रुग्णसंख्येची कमान चढती राहिली आहे. सुरुवातीला परदेशात प्रवास करून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आणि काही रुग्ण आढळले. एप्रिलनंतर मात्र कोरोनाचा प्रसार पुण्यातील पेठांमध्ये झाला. विशेषतः भवानी पेठेत कोरोनाचा सर्वांत मोठा फटका बसला. 

कोरोनाचा संभाव्य प्रसार मांडणारी वेगवेगळी मॉडेल्स सध्या चर्चेत आहेत. या मॉडेलवरून कोरोनाच्या वाटचालीचा अंदाज घेता येतो. सीपीसी ऍनॅलिटिक्‍स या कंपनीचे प्रमुख साहिल देव यांनी ट्‌विटवर प्रसिद्ध केलेल्या मॉडेलमध्ये कोरोनाच्या वाढीचा वेग गेल्या सात दिवसांत घटल्याचे म्हटले आहे. एकाबाजूने वाढीचा वेग कमी होत असताना दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पुणेकरांनो, घरात औषधांचा साठा करून ठेवा, कारण...

"कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज तेरा टक्के राहिली आहे आणि त्याचवेळी नव्या रुग्णांची संख्या सहा टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली आहे,' असे ट्‌विट साहिल देव यांनी केले आहे. हा ट्रेंड कायम राहिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी एका अनौपचारिक चर्चेत, येत्या दोन आठवड्यात पुण्यातील कोरोनावाढीचा ट्रेंड 'फ्लॅट कर्व्ह'कडे झुकण्याची शक्‍यता वर्तविली होती. आलेखावरच्या बिंदूवर कोरोनाच्या रुग्णांची मांडणी केली, तर एका विशिष्ट काळापर्यंत चढी कमान दिसते. त्यानंतर आलेखाची कमान उतरणीकडे लागते. पुण्यातील रुग्णवाढीचा सर्वोच्च बिंदू गाठत आला आहे, असा गायकवाड यांच्या विधानाचा अर्थ होतो. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून कोरोनाचे 3282 रुग्ण आज (गुरुवार, ता. 14) दुपारपर्यंत आढळले आहेत. आजअखेर 175 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पुण्यामध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून लॉकडाउनसदृष परिस्थिती आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात किंचित शिथिलता आली आहे. तथापि, नागरिक मास्क लावूनच घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. 

या साऱ्यांचा परिणाम म्हणून कोरोनाच्या रुग्णांची संख्या मर्यादित राहाते आहे. देव यांनी केलेल्या ट्‌विटमधील ट्रेंड आणि आयुक्तांचा अंदाज यांचा एकत्रित विचार केला, तर येत्या दोन आठवड्यात पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटण्याची शक्‍यता आहे. मात्र, लॉकडाउनमधील नियमांचे कसोशीने पालन केले, तरच त्यामध्ये यश येणार आहे. 

loading image
go to top