#WeCareForPune पुण्यात सन्नाटा

pune-nashik-phata
pune-nashik-phata

पुणे - वाहनांच्या गर्दीमुळे एरवी गजबजलेले रस्ते रविवारी निर्मनुष्य झाले होते. पुणे-पिंपरीतील प्रमुख रस्ते असो अथवा जिल्ह्यांतील प्रमुख मार्ग... सगळीकडे नीरव शांतता होती. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठा बंद होत्या. शहरातील उपनगरे असो अथवा औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडचाही त्याला अपवाद नव्हता. जिल्ह्यातील बारामतीपासून लोणावळ्यापर्यंत सगळीकडेच ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी प्रतिसाद दिला.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढती असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होण्याची साद नागरिकांना घातली होती. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. रस्त्यावरील वाहतूक पूर्ण थांबली होती. पोलिसांची गस्त अनुभवतानाच पक्ष्यांचा किलबिलाटही रविवारी ऐकायला आला. शहरात अघोषित संचारबंदीचेच दृश्‍य रविवारी होते. पुणे शहर आणि काही उपनगरे फिरल्यानंतर दुकान काय, एखादी टपरीही कुठे उघडी नव्हती. एरवी वाहनांच्या गर्दीत न दिसणारे रस्तेही आपल्याच मोकळेपणाने अवाक्‌ झाले होते. चुकून एखादी दुचाकी किंवा माणूस रस्त्यावर दिसलाच, तर पोलिसही आपले काम करत होते. स्वारगेट ते कात्रज, धनकवडी, बालाजीनगर परिसरात पोलिसांशिवाय कुणीही दिसत नव्हते. पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर, महंमदवाडीने भयाण शांतता अनुभवली. कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, नगर रस्त्यावरील लोकवस्त्याही निर्मनुष्य वाटत होत्या.

उद्योगनगरी स्तब्ध
पिंपरी - सकाळी सातपासूनच ‘जनता कर्फ्यू’ लागू होणार होता. त्यामुळे कोणी दुकानेच उघडली नाहीत. काहींनी शनिवारी सायंकाळीच दूध आणि अन्य वस्तू घेऊन ठेवल्या होत्या. रविवारी सकाळपासूनच शहरातील पुणे-मुंबई, पुणे-नाशिक आणि मुंबई-बंगळुरू (देहूरोड-कात्रज बाह्यवळण) महामार्गांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठा, मंडई, पीएमपी बसथांबे, रेल्वे स्थानके, एमआयडीसी आदी ठिकाणी चिटपाखरूही नव्हते. कर्फ्यूमध्ये नागरिकांनी सोसायटीमधून बाहेर पडू नये म्हणून काही सोसायट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले होते. त्यामुळे ये-जा पूर्णपणे बंद होती. चिंचवड स्टेशन चौक परिसराजवळ असणाऱ्या झोपडपट्टीतील तरुण रस्त्यावर येऊन हुल्लडबाजी करत होते. या ठिकाणी कार्यरत असणारे बीट मार्शल त्या ठिकाणी पोचल्यानंतर हे तरुण पळाले. मॉर्निंग वॉकसाठीही फारसे कोणी घराबाहेर पडले नाही. 

जिल्ह्यात अभूतपूर्व शांतता
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या सातारा, नगर, नाशिक, सोलापूर या प्रमुख महामार्गांसह गावोगावचे रस्ते ओस पडले होते. चाकण, रांजणगाव, पिरंगुट या औद्योगिक परिसरातील कंपन्यांनीही काम बंद ठेवले. अनेक ठिकाणचे रविवारचे आठवडे बाजारही बंद होते. 

दौंड शहरातील बाजारपेठ रविवारी सलग तिसऱ्या दिवशी बंद होती, तरीही दौंडकरांनी ‘जनता संचारबंदी’च्या आवाहनाला प्रतिसाद दिला. राजगुरुनगर येथे आणि पुणे-नाशिक रस्त्यावर अभूतपूर्व शांततेचे वातावरण पाहावयास मिळत होते. शिरूरकरांनी कडकडीत बंद पाळून प्रतिसाद दिला. जुन्नर शहरातील नागरिकांना २३ वर्षांपूर्वी शहरात तीन दिवस लागू झालेल्या कर्फ्यूची आठवण झाली. इंदापूर शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य होते. एसटी व रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनेही ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभाग घेतल्याने बारामती पूर्णपणे थांबली होती. एसटी व रेल्वेसेवा ठप्प असल्याने बारामतीत कोणी आले नाही आणि कोणी बाहेरही गेले नाही. भोर शहरामधील व्यवहार दिवसभर ठप्प झाले होते. 

उद्योग थांबले, कामगार पांगले
भोसरी आणि रांजणगाव एमआयडीसी परिसरात शुकशुकाट होता. त्यामुळे पुणे-नगर, नाशिक रस्ता ओस पडला होता. एमआयडीसीतील बहुतांश कंपन्यांनी प्रतिसाद दिला. फूड प्रोसेसिंगच्या नावाखाली मोजक्‍या कंपन्यांचे काम चालूच होते. कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून चाकण औद्योगिक वसाहतीमधील बहुतेक कंपन्या सुरूच होत्या. परंतु, रविवारी संपूर्ण एमआयडीसी ठप्प झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com