फक्त दहाच दिवसांत झाला घटस्फोट

सनील गाडेकर
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

संमतीने ११ दिवसांत झाले विभक्त
प्रेमविवाहानंतर अवघ्या सहा महिन्यांतच वैचारिक मतभेदामुळे वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दांपत्याने परस्पर संमतीने घटस्फोसाठी दाखल केलेला दावा न्यायालयाने मंजूर केला. ७ जून रोजी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने १८ जून रोजी म्हणजे अवघ्या ११ दिवसांत निकाली काढला. यापुढे एकमेकांना काही त्रास द्यायचा नाही, असेही त्यांच्यात ठरले आहे.

पुणे - नोकरीसाठी परदेशात जायचे आहे... माझी दुसऱ्या ठिकाणी बदली झाली आहे... काहीही झाले तरी यापुढे बरोबर राहणे शक्‍य नाही... अशी विविध कारणे देत विभक्त होऊ पाहणारी दांपत्ये आता एक क्षणही बरोबर राहण्यास तयार नाही. एवढेच काय घटस्फोटासाठी दावा केल्यानंतर सहा महिने थांबायचा कालावधीदेखील वगळण्याची मागणी अर्जदारांकडून करण्यात येत आहे.

विविध कारणांमुळे भांडण झाल्यानंतर दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात. त्यामुळे त्यांच्यातील संवाद व प्रेम कमी झालेले असते. त्यामुळे दावा दाखल केल्यानंतरही सहा महिने का थांबायचे. त्यापेक्षा लगेच वेगळे होऊन आपापल्या मार्गाला लागू अशी भूमिका घेतली जात आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) घटस्फोटाचा दावा निकाली काढण्यासाठी अर्ज केल्यापासून सहा महिने थांबण्याची तरतूद कायद्यात आहे. या कालावधीत त्यांच्यातील वाद मिटावा, असा उद्देश असतो. मात्र ते पुन्हा एकत्र येण्याची शक्‍यता नसल्यास अपवादात्मक परिस्थितीमध्ये सहा महिन्यांचा कालावधी वगळण्यात येतो. याच तरतुदीचा फायदा घेत आम्हाला लवकरात लवकर विभक्त करा, अशी विनंती न्यायालयास केली जात आहे. एकत्र राहणे का शक्‍य नाही, याचे पुरावे सादर केल्यास घटस्फोटाचा अर्ज त्वरित मंजूर करण्यात येतो. या सर्वांत संमतीने अर्ज करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रतिवादीदेखील विरोध करीत नाही. 

दहा दिवसांत झाला घटस्फोट
मध्यंतरी कुवेतमध्ये राहणारी पत्नी व पुण्यातील पतीला केवळ १० दिवसांत घटस्फोट देण्यात आला होता. पत्नी कुवेतला राहत असल्याने तिला दर तारखेस येथील कौटुंबिक न्यायालयात हजर राहणे शक्‍य नव्हते. न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तिची साक्ष नोंदवत एकाच तारखेत त्यांना घटस्फोट मंजूर केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Claim for divorce

टॅग्स