गावात आलेल्या पाहुण्यांमुळे गावोगावी होताहेत वाद

महेंद्र शिंदे
बुधवार, 20 मे 2020

- बाहेरगावावरून मूळगावी परतलेल्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात भांडण-तंट्याचे प्रमाण वाढले

कडूस : बाहेरगावावरून मूळगावी परतलेल्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात भांडण-तंट्याचे प्रमाण वाढले आहे. या नागरिकांच्या 14 दिवसांच्या क्वारंटाईनचा मुद्दा वादाचे मूळ ठरत आहे. या वादामुळे गावागावात तणाव वाढला आहे. सरपंच, ग्रामसेवकांसह पोलिसांना हे तंटे मिटवावे लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसात मुंबई, पुणे अथवा अन्य ठिकाणावरून मूळ गावी परतलेल्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मिळेल त्या वाहनाने अथवा पायी, रात्रीअपरात्री आडमार्गाने गावी येणाऱ्यांचा ओघ अजूनही थांबलेला नाही. गेल्या आठ दिवसात खेड तालुक्यात सुमारे चाळीस हजाराच्यावर नागरिक आले आहेत. एकट्या कडूस गावात पाचशेच्यावर तर शेजारच्या गारगोटवाडीत तीनशे, दोंद्यात पाचशे, कोहिंडयात चारशे, सायगाव दोनशे, साबुर्डी तीनशे, पापळवाडी दोनशे अशा तालुक्यातील 162 ग्रामपंचायत हद्दीत नागरिक आले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावात आलेल्या या नागरिकांमुळे गावातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. कोरोनामुळे या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो. पण हे नागरिक नियम पाळत नसल्याने गावोगावी तंट्याचे प्रमाण वाढले आहे. गावातील शाळेत क्वारंटाईन होण्यास हे नागरिक नकार देत आहे. 'गावात माझे घर आहे. घरात थांबतो. शाळेत का राहू. नाही राहणार,' अशी भूमिका घेत पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर्स यांना आव्हान देत आहेत. तर या नागरिकांच्या होम क्वारंटाईनला त्याच्या घराच्या आजूबाजूचे ग्रामस्थ आक्षेप घेत आहे. त्यांच्या मते 'ही ब्याद आमच्या शेजारी नको. आम्हाला व गावाला धोका आहे. यांना दुसरीकडे कुठेही ठेवा.' यामुळे ग्रामस्थ व गावात आलेल्या नागरिकांमध्ये भांडण-तंटे होत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील अशी बहुतांश गावात परिस्थिती आहे. पोलीस ठाण्यापर्यंत वाद पोचले आहेत. कडूसच्या सरपंच जयश्री नेहेरे म्हणाल्या, 'ही लोक घरात राहण्याचा अट्टाहास करतात. ऐकत नाही. घरातील अन्य सदस्यांसोबत एकत्र राहतात पण क्वारंटाईनचे नियम पाळीत नाहीत. ते घरात थांबतात अन् घरातील अन्य सदस्य गावभर फिरत असतात. याला ग्रामस्थ आक्षेप घेत आहेत. यामुळे गावात तंटे वाढले आहेत.'

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजगुरूनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी म्हणाले, 'परवाना व बिगरपरवाना अशा दोन्ही पद्धतीने परगावातून मोठ्या प्रमाणात नागरिक आले आहेत. या नागरिकांच्या क्वारंटाईनच्या मुद्यामुळे गावोगावी तंट्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाद पोलीस ठाण्यापर्यंत आले आहेत. या नागरिकांना नियम पाळण्याचा सल्ला दिला जात आहे. तरीही ऐकत नसलेल्यांवर भा.द.वि.कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clashes on Quarantine Issue in Kadus Pune