
पुणे : ‘‘शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्याची गरज आहे. अनेकदा रोगमुक्त रोप न मिळाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होते. त्यासाठी कीड व रोगमुक्त, दर्जेदार रोपांची गरज ओळखून देशभरात नऊ ‘स्वच्छ रोपनिर्मिती केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत. त्यातील तीन केंद्रे महाराष्ट्रात उभारली जाणार आहेत,’’ अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. पुण्यात द्राक्ष, नागपुरात संत्री आणि सोलापुरात डाळिंब या पिकांसाठी केंद्रांची निर्मिती केली जाईल. या उपक्रमासाठी केंद्र सरकारकडून ३०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.