सातारा हवामान बदलाचा महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला फटका बसणार ?

सातारा हवामान बदलाचा महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला फटका बसणार ?
Published on: 

हवामान बदलाचा स्ट्रॉबेरीला फटका शक्य

महाबळेश्वर तालुक्याचा स्ट्रॉबेरी उत्पादनात जवळपास ८० टक्के वाटा

विकास जाधव : ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : हवामानातील प्रतिकूल बदल आणि ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा महाबळेश्वर परिसरातील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. थंडीचा अभाव, ऑक्टोबरपासूनच तापमानात झालेली मोठी वाढ आणि परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ यामुळे यंदाच्या हंगामात स्ट्रॉबेरीच्या एकूण उत्पादनात तब्बल ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अनुकूल हवामान न लाभल्यास उत्पादनावर होणाऱ्या या विपरीत परिणामामुळे स्थानिक फळबाजार, प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन व्यवसायाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्ट्रॉबेरी उत्पादनात महाबळेश्वर तालुक्याचा वाटा जवळपास ८० टक्के इतका मोठा आहे. या पिकासाठी तालुक्यातील शेतकरी दरवर्षी अमेरीका, कॅलिफोर्निया, स्पेन, इटली आणि इजिप्त येथून मदर प्लांट आयात करतात. दरवर्षी सुमारे दोन हजार शेतकरी मिळून तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड करतात, ज्यातून सरासरी ५० हजार टन उत्पादन निघते आणि यातून सुमारे २५० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. साधारणतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत लागवड पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला ताजी फळे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात.

उष्णतेमुळे लहान आकाराची
फळे पक्व होण्याचा धोका
स्ट्रॉबेरी हे मुळात कडक थंडीत नैसर्गिकरीत्या पोसणारे आणि पक्व होणारे पीक आहे. मात्र, सध्या थंडी गायब होऊन तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने फळधारणेच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे स्ट्रॉबेरीची फळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच, लहान आकारात लवकर पक्व होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. फळांचा आकार लहान राहिल्याने आणि दर्जा खालावल्याने ग्राहकांकडून मिळणाऱ्या मागणीवर परिणाम होईल, ज्यामुळे बाजारपेठेतील मागणी-पुरवठ्याचे संपूर्ण शास्त्रच बिघडणार आहे.

लागवड संथ गतीने;
प्रक्रिया उद्योगांनाही झळ
आवश्यक थंडीचा अभाव आणि पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने सध्या लागवडीची कामेही संथ गतीने सुरू आहेत. सद्यःस्थितीत तालुक्यात केवळ ६० टक्के क्षेत्रावरच लागवड पूर्ण झाली असून उर्वरित काम ऑक्टोबर अखेरपर्यंत संपण्याची अपेक्षा आहे. हंगामाच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीला प्रति किलो ५०० ते ६०० रुपये दर मिळण्याची शक्यता असली, तरी उत्पादनात निम्म्यापर्यंत घट आल्यास स्थानिक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाची भरपाई करणेही कठीण जाईल. तसेच उत्पादनातील या तुटवड्यामुळे बाजारपेठेतील भाव कडाडण्यासोबतच जॅम, सिरप यांसारख्या प्रक्रिया उद्योगांना कच्च्या मालाचा मोठा तुटवडा भासणार आहे. येत्या काळात पिकास पूरक वातावरण निर्माण न झाल्यास तालुक्यातील फलोत्पादन क्षेत्राला मोठा हादरा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोट ---
स्ट्रॉबेरी पीक तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट झाल्यास महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम होतील.
- किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, महाबळेश्वर तालुका फळे, फुले व भाजीपाला सहकारी विक्री संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com