आजोबांनी तब्बल एक हजार वेळा केली सिंहगडाची चढाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघचौरे आजोबा यांची १००० वी सिंहगड वारी पूर्ण,सह्याद्री ट्रेकिंग फाउंडेशन आणि सिंहगड परिवारातर्फे सत्कार

आजोबांनी तब्बल एक हजार वेळा केली सिंहगडाची चढाई

पुणे : छंद जोपासायला वयाची अट नसते, हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखविले आहे नाना पेठेतील एका साठीतील तरुण रिक्षा चालकाने. बाळकृष्ण वाघचौरे या आजोबांनी तब्बल एक हजार वेळा सिंहगडाची चढाई केली आहे. त्यांच्या कामगिरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांचे याबद्दल कौतुकही होत आहे.

वाघचौरे आजोबा यांनी नुकतीच १००० वी सिंहगड वारी पूर्ण केली आहे. यासाठी सह्याद्री ट्रेकिंग फाउंडेशन आणि सिंहगड परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. वाघचौरे हे ऑक्टोबर २००८ पासून गड किल्ल्यांची भटकंती करत पुणे, नाशिक या भागात विविध गड-किल्ल्यांचे सर त्यांनी केले आहे. याबाबत वाघचौरे यांनी सांगितले, ‘‘गिर्यारोहण, गड किल्ल्यांची भटकंतीचा छंद असल्याने वेळ मिळेल तसे गड-किल्ले सर करत होतो. त्याचबरोबर रिक्षा व्यवसाय असल्याने हुजूरपागा शाळेत विद्यार्थ्यांना सेवा उपलब्ध करत आहे.

कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने कामही बंद झाले, त्यामुळे या वेळेचा वापर कसा करायचा हा प्रश्‍न होता. त्यानंतर गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीत वाढ होऊ लागली आणि सिंहगड वारीचे प्रमाण वाढले. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहतेच पण विविध लोकांशी भेटता येते.’’ या पुढेही हा प्रवास असाच कायम राहणार असून आठवड्याला किमान दोन वेळा गड-किल्ल्यांची भटकंती करण्याची इच्छा आहे. असेही ते म्हणाले.

‘‘सध्याच्या जगात ताण-तणाव वाढत आहे. त्यात तरुण पिढीने आपले छंद जपणे खरंच गरजेचे आहे. दैनंदिन कामासोबत छंद जपण्यासाठी वेळेची नाही तर इच्छाशक्ती गरज असते. मी या वयात माझा व्यवसाय आणि छंद दोन्ही गोष्टी करत आहे. त्यामुळे कोणती ही गोष्ट साध्य करण्यासाठी वयाची किंवा वेळेची अडचण नसते.’’

- बाळकृष्ण वाघचौरे

एकाच दिवसात केले तीन गड सर :

वाघचौरे यांनी सिंहगड, राजगड आणि तोरणा हे तीन गड एकाच दिवशी सर केले आहे. त्याचबरोबर त्यांनी पुणे व नाशिक येथील लोहगड, विसापूर, वैराट गड, लोणावळा ते राजमाची, कुर्दूगड, हरिश्र्चंद्र गड, जंजिरा, सिंधुदुर्ग, लिंगाणा, ब्रम्हगिरी, दुर्गभांडार, हरिहर गड, भास्कर गड असे अनेक गड-किल्ले सर केले आहेत. तसेच त्यांनी हिमालयातील ट्रेकिंगच्या मोहिमा देखील केल्या आहेत.

Web Title: Climbed Sinhagad Thousand Times Balkrishna Waghchaure Felicitated Sahyadri Trekking Foundation And Sinhagad Family

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top