esakal | मांडवातील लसीकरण केंद्र बंद करा ; अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

मांडवातील लसीकरण केंद्र बंद करा ; अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करताना काही ठिकाणी ठेकेदाराकडून मांडव घालून तेथे लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मांडवातील तसेच खासगी जागेतील लसीकरण केंद्र त्वरित बंद करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.

पुणे महापालिकेतर्फे शहरात सुमारे २०० लसीकरण केंद्र निश्‍चीत केली आहे. यामध्ये प्रशासन आणि प्रत्येक नगरसेवकाच्या मागणीनुसार महापालिकेच्या शाळा, दवाखाने, विरंगुळा केंद्र यासह इतर ठिकाणे निश्‍चीत केली आहेत. त्यामुळे लसीकरणावरून सुरू असलेला गोंधळ व भांडणे कमी झाली आहेत. असे असतानाही शहरात महापालिकेच्याच जागेत ठेकेदाराकडून मांडव घालून तेथे लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. या मांडवाच्या खर्चाचा भूर्दंड महापालिकेला सहन करावा लागत आहेत. तसेच कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यासाठीही मांडव घालण्यात आले आहेत. काही ठिकाणी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून थेट खासगी जागेत लसीकरण केंद्र व स्वॅब सेंटर सुरू केले आहेत.

याबाबत अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. सर्व खाते प्रमुख व उपायुक्तांनी ज्यांच्या कार्यक्षेत्रात मांडवात किंवा खासगी जागेत सुरू असलेले लसीकरण केंद्र व स्वॅब सेंटर बंद करावेत. त्याऐवजी महापालिकेचे पक्के बांधकाम असलेल्या जागेत ते सुरू करावेत. याचा अहवाल पुढील ७ दिवसात अतिरिक्त आयुक्त कार्यालयाला सादर करावा. यानंतरही मांडवात किंवा खासगी जागेचा वापर सुरू असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे बिनवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.

शाळा सुरू झाल्याने अडचण

गेल्या आठवड्यात शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तेथे सुरू असलेले लसीकरण केंद्र काही ठिकाणी मांडव घालून सुरू करण्यात आले आहेत. पण विनाकारण मांडवाचा खर्च वाढत असल्याने अशाप्रकारे लसीकरण करू नये, त्याऐवजी दुसरे महापालिकेचे पक्के बांधकाम असलेले ठिकाण बघावे असे आदेश दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top