मंचर - 'कांदा उत्पादनाच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य देशामध्ये अग्रेसर आहे. यावर्षी कांद्याचे उत्पादन नेहमीपेक्षा सुमारे १२५ टक्के अधिक झाले आहे. केंद्र शासनाने कांद्यावर २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव घसरले असून शेतकरी अडचणीत आले आहेत. निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकर घ्यावा.' अशी मागणी माजी सहकारमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.
'केंद्र सरकारने कांद्यावर कर (ड्युटी) लावल्यामुळे निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. पर्यायाने कांद्याच्या बाजार भावामध्ये मोठया प्रमाणात घसरण झाली असून शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटविल्यास कांद्याचे भाव स्थिर राहून शेतक-यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कांदा उत्पादक शेतक-यांचे प्रतिनिधी व हॉर्टिकल्चर प्रोडयूस एक्सपोर्टस् असोसिएशन यांचे प्रतिनिधी यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री, पणन यांचे उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करावे.
राज्य शासनाच्या वतीने शेतक-यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारला कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याबाबत विनंती करावी.' असे वळसे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात म्हणाले, 'आंबेगाव तालुका कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मुख्य बाजार मंचर व लोणी उपबाजारात ता. १ मार्च २०२४ पासून ता. १२ मार्च २०२५ पर्यंत २८ लाख ३४ हजार ७२० कांदा पिशव्यांची आवक झाली आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रती दहा किलोला ३०० रुपये ते ७०० रुपये विक्रमी बाजारभाव मिळाला होता. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सरासरी २०० ते ५५० रुपये प्रती दहा किलोला बाजारभाव मिळाला होता. मार्च २०२४ मध्ये ७० ते १२० रुपये व सध्या ता. १ मार्च ते ता. १२ मार्च २०२५ या कालवधीत ११० ते २९० रुपये प्रती दहा किलोला बाजारभाव मिळत आहे.
बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मंचर येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटले होते. तातडीने वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना न्याय मिळेल असा विश्वास आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.