

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत २७६ ग्रामपंचायतींचे मूल्यमापन सुरू
जिल्ह्यात १५ मेपर्यंत २७६ ग्रामपंचायतींचे होणार मूल्यमापन
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : संपूर्ण राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय बाह्य समितीकडून मूल्यमापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा तपासणी कार्यक्रम सुरू झाला असून २६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत २७६ ग्रामपंचायतीची तपासणी होणार आहे.
या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता, पारदर्शकता, सेवा वितरणाची गुणवत्ता आणि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे हा आहे.त्याचबरोबर ग्रामपंचायतींनी राबविलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत कितपत पोहोचला आहे.याचाही सखोल आढावा घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये बाह्य तालुकास्तरीय समितीमार्फत ही तपासणी होणार असून,प्रत्येक तालुक्यासाठी इतर जिल्ह्यातील पंचायत समितींची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्या संबंधित ग्रामपंचायतींना भेट देऊन नोंदी, कामांची पाहणी, प्रत्यक्ष स्थळभेट,लाभार्थ्यांशी संवाद आणि सेवा वितरण प्रणालीची तपासणी करण्यात येणार आहे.या तपासणी अंतर्गत जिल्ह्यातील एकूण २७६ ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.समित्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार गुणांकन करण्यात येईल. यामध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा,शिक्षण,डिजिटल सेवा, ग्रामनिधीचा वापर,महिला व बालकल्याण उपक्रम, तसेच विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी यांचा समावेश असेल.
---------
चौकट:
अशी आहे समित्यांची नियुक्ती:
सुधारित नियोजनानुसार बागलाण तालुक्यासाठी मंठा (जालना), चांदवडसाठी घनसावंगी (जालना),देवळ्यासाठी जालना, दिंडोरीसाठी जाफ्राबाद (जालना),इगतपुरीसाठी अंबरनाथ (ठाणे), कळवणसाठी परतूर (जालना),मालेगावसाठी गंगाखेड (परभणी), नांदगावसाठी पूर्णा (परभणी),नाशिक तालुक्यासाठी वाडा (पालघर), निफाडसाठी अंबड (जालना), पेठसाठी जव्हार (पालघर), सिन्नरसाठी बदनापूर (जालना), सुरगाण्यासाठी शहापूर (ठाणे),त्र्यंबकेश्वरसाठी विक्रमगड (पालघर) आणि येवला तालुक्यासाठी पालम (परभणी) या पंचायत समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-------
प्रतिक्रिया:
जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित पंचायत समित्या, ग्रामपंचायती तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना या मूल्यमापन प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामीण भागातील विकास प्रक्रियेला गती मिळाली असून, ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मकता वाढून उत्तम कामगिरीस प्रोत्साहन मिळाले.
-प्रतिभा संगमनेरे,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.