
राजकारणात कोणी कोणाचा फार काळ जसा मित्र नसतो, तसाच तो फार काळ शत्रूही राहत नाही, असे म्हटले जाते. राजकारणात काहीही अशक्य नसते, हे जसे महाविकास आघाडीच्या निमित्ताने समोर आले, तिच स्थिती आता
शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य, पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ
बारामती (पुणे) : राजकारणात कोणी कोणाचा फार काळ जसा मित्र नसतो, तसाच तो फार काळ शत्रूही राहत नाही, असे म्हटले जाते. राजकारणात काहीही अशक्य नसते, हे जसे महाविकास आघाडीच्या निमित्ताने समोर आले, तिच स्थिती आता इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीतही घडण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.
सहकारातील दिग्गज मात्र काही वर्षांपूर्वी शरद पवार व अजित पवार यांच्यापासून दुरावलेले पृथ्वीराज जाचक आता पुन्हा राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहाच्या दिशेने सरकले आहेत. आज मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाचक यांनी शरद पवार यांच्या समवेत दुपारचे जेवण घेतले. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरु केलेली ही मनोमिलनाची प्रक्रीया आज अखेर फलद्रुप झाली. आज शरद पवार व पृथ्वीराज जाचक यांच्यात मुंबईत सविस्तर चर्चा झाली. किरण गुजर हेही या प्रसंगी उपस्थित होते.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
छत्रपती सहकारी साखर कारखान्यात आपल्याला डावलले जात असल्याच्या भावनेतून जाचक यांनी पवारांसोबत काडीमोड घेतला व वेगळी चूल मांडली. हा विरोध इतका तीव्र होता की, जाचक यांनी थेट लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनाच आव्हान दिले होते. मात्र, कालांतराने स्थिती बदलली. राज्यात भाजप सेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतरही जाचक यांचा विरोध कायमच होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले व पृथ्वीराज जाचक यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आज शरद पवार यांनीही याला हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे आता जाचक राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहात पवार कुटुंबियांसोबत असतील, हे जवळपास निश्चित झाले आहे.
अजित पवार यांच्या समवेत या पुढील काळात छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहणार असल्याचे जाचक यांनी स्पष्ट केले आहे.