

किनारपट्टीवरील हवामान धोक्यांचे मूल्यमापन
‘आयआयटी मद्रास’चा एकात्मिक आराखडा
चेन्नई, ता. १६ (पीटीआय) : हवामानबदलामुळे भारताच्या किनारपट्टीवर होणारे परिणाम आणि त्यातून निर्माण होणारे धोके जाणून घेण्यासाठीच; तसेच पायाभूत सुविधा, परिसंस्था आणि असुरक्षित समुदायांच्या संरक्षणासाठी व्यवहार्य उपाययोजना निश्चित करण्याच्या उद्देशाने ‘आयआयटी मद्रास’च्या संशोधकांनी एकात्मिक आराखडा विकसित केला आहे.
‘आयआयटी मद्रास’ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने ‘आयआयटी मद्रास’मधील किनारी पायाभूत सुविधांवरील हवामानबदलाचे परिणाम आणि अनुकूलन धोरणांसाठी उत्कृष्टता केंद्रामध्ये हे संशोधन करण्यात आले. या आंतरशाखीय केंद्रात हवामानशास्त्र, किनारी अभियांत्रिकी, जलस्रोत आणि पर्यावरण अभियांत्रिकी या क्षेत्रांतील तज्ज्ञ एकत्र काम करतात. या संशोधनातील निष्कर्ष सिंगापूरमधील परिषदेत सादर करण्यात आले.
भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर महत्त्वाची बंदरे, मासेमारी बंदरे, वीज प्रकल्प, उद्योग, शहरी वसाहती आणि संवेदनशील परिसंस्था आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता आणि टोकाच्या हवामान घटनांची वाढती वारंवारता यामुळे पायाभूत सुविधा आणि उपजीविकेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. चक्रीवादळे, वादळी समुद्रलाटा, किनारी पूर, समुद्रकिनाऱ्याची धूप, समुद्रपातळीत वाढ आणि अतिवृष्टी यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचे मूल्यमापन करण्यासाठी संशोधकांनी प्रगत प्रारूपे आणि साधने विकसित केली आहेत. भारतीय किनारपट्टीचा विचार करून हवामान, चक्रीवादळ, वादळी समुद्रलाटा, लाटा, जलगतिकीय आणि किनारपट्टीच्या भूरूपीय बदलांची प्रारूपे विकसित करण्यात आली आहेत. संशोधकांनी विकसित केलेल्या नव्या वाऱ्यांच्या माहितीच्या एकत्रीकरणाच्या तंत्रामुळे वादळी समुद्रलाटांचा अंदाज अधिक अचूक होण्यास मदत झाली आहे.
चेन्नईतील पूरग्रस्त भागांचे प्रारूप तयार करून त्यांचे नकाशेही तयार करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची तयारी आणि शहरी नियोजनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. समुद्रपातळीतील वाढ आणि वादळी समुद्रलाटांचा परिणाम लक्षात घेऊन चेन्नई, एन्नोर आणि कराईकलसाठी किनारी असुरक्षितता निर्देशांकाचे नकाशे तयार करण्यात आले आहेत.
या केंद्राचे प्रमुख संशोधक आणि ‘आयआयटी मद्रास’च्या महासागर अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक एस. ए. सन्नासीराज म्हणाले, ‘‘भारताच्या किनारपट्टीवर देशातील अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा असून लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार या भागावर आहे. हवामानबदलामुळे किनारी धोक्यांची तीव्रता आणि वारंवारता वाढत असल्याने किनारपट्टीची लवचिकता वाढविण्याला तातडीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. आमच्या केंद्राने हवामान प्रारूपे, अभियांत्रिकी उपाय आणि समुदायाच्या सहभागावर आधारित अनुकूलन यांची सांगड घालणारा सर्वंकष दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यामुळे किनारी भागांमधील धोके कमी करण्यासाठी आणि आपत्तीच्या वेळी तयारी अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्यक्षात वापरता येतील अशा उपाययोजना उपलब्ध होतील.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.