संशोधन केंद्रातून उद्योजकतेला मिळणार प्रोत्साहन

संशोधन केंद्रातून उद्योजकतेला मिळणार प्रोत्साहन
Published on

पुणे, ता. १५ : ‘‘अत्याधुनिक संशोधन, आंतरविद्याशाखीय सहकार्य आणि तंत्रज्ञानावर आधारित नवोपक्रम यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे उभारलेले केंद्र प्रगत संशोधनासाठी परिसंस्था अधिक बळकट करेल. कैलाथ हे केवळ शास्त्रज्ञ नसून, यशस्वी उद्योजकही आहेत. त्यांच्या नावाने सुरू केलेले हे केंद्र विद्यार्थ्यांमधील उद्योजकता आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देईल,’’ असा विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांनी व्यक्त केला.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या पुढाकाराने ‘प्रोफेसर थॉमस कैलाथ सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ या उत्कृष्टता केंद्राचे उद्‌घाटन डॉ. केळकर यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, ज्येष्ठ अभियंते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबरला साजरा होणाऱ्या अभियांत्रिकी दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला. या वेळी प्रोफेसर थॉमस कैलाथ यांच्या पत्नी आणि अर्थशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अनुराधा ल्यूथर मैत्रा, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ. विभा व्यास उपस्थित होत्या.
डॉ. केळकर म्हणाले, ‘‘विद्यापीठाने विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या जागतिक पातळीवरील संशोधक, अभ्यासक आणि उद्योजकांची फळी निर्माण केली. प्रा. थॉमस कैलाथ हेही त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव असून, अभियांत्रिकी दिनानिमित्ताने या केंद्राचे उद्‌घाटन होणे, ही विशेष बाब आहे. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रेरणादायी वारशाला आधुनिक संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.’’
‘‘प्रा. थॉमस कैलाथ हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील प्रभावशाली शास्त्रज्ञ असून, सीओईपीचा मानबिंदू आहेत. त्यांचे कार्य मूलभूत संशोधनावर आधारित असून, हे केंद्र विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत संशोधनाची वृत्ती रुजवेल,’’ असे डॉ. भिरूड म्हणाले. सूत्रसंचालन डॉ. मेघा यन्नावार, युगा कदम यांनी केले. डॉ. राधिका जोशी यांनी आभार मानले.

‘सीओईपी’ने दिली संस्मरणीय भेट
डॉ. अनुराधा म्हणाल्या, ‘‘या केंद्राच्या माध्यमातून ‘सीओईपी’ने प्रा. कैलाथ यांना एक संस्मरणीय भेट दिली. वयाच्या ९०व्या वर्षी त्यांच्या महाविद्यालयाने त्यांना दिलेल्या या सन्मानाने त्यांच्यासह आम्ही कुटुंबीय भारावून गेलो आहोत. कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन थिअरीचे प्रणेते असलेले प्रा. थॉमस कैलाथ यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा पाया पुण्यातील सीओईपीमध्ये निर्माण झाला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com