सर्दी, खोकल्यानंतर जुलाबाने बेजार; सुटी, नववर्षाची मजा आली मुलांच्या अंगलट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cold cough

पुणे शहरातील दवाखान्यांमध्ये आतापर्यंत सर्दी, ताप, खोकला आलेल्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्याचबरोबर आता जुलाबाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.

Sickness : सर्दी, खोकल्यानंतर जुलाबाने बेजार; सुटी, नववर्षाची मजा आली मुलांच्या अंगलट

पुणे - शहरातील दवाखान्यांमध्ये आतापर्यंत सर्दी, ताप, खोकला आलेल्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्याचबरोबर आता जुलाबाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. नाताळची सुटी, ३१ डिसेंबर या सर्वांचा परिणाम म्हणून या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने मुलांवर औषधोपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

शहरातील लहान मुला-मुलींना गेल्या १५-२० दिवसांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे प्रमाण वेगाने वाढले होते. ते आता काही अंशी कमी झाले आहे. पण, त्या पाठोपाठ आता जुलाबाचे रुग्ण वाढले आहेत. नाताळच्या सुटीमध्ये बाहेरगावी झालेला प्रवास आणि ३१ डिसेंबरमुळे खाण्यात आलेले पदार्थ याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसते. त्यामुळे जुलाबाचे रुग्ण वाढल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदविले.

बालरोगतज्ज्ञ शरद आगरखेडकर म्हणाले, ‘सध्या काही मुलांमध्ये गोवर आणि त्याची लक्षणे दिसत आहेत. यात अंगावर रॅश येऊन ताप येतो. तसेच, काही विषाणूजन्य आजारांनीही डोके वर काढले आहे. त्यात कांजिण्या वाढल्या आहेत. तसेच, पौगंडावस्थेतील काही मुलांमध्ये रॅशसह ताप येऊन मानेमध्ये गाठी येणे हे दिसत आहे.’

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस आणि बूस्टर घेतले नाहीत, त्यांनी ते पूर्ण करावे. तसेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप केले नसल्यास त्वरित करून घ्यावे. लसीकरणामुळे आजार गंभीर होत नाही आणि रुग्णालयात दाखल करायची गरज कमी होते, असा सल्लाही बालरोग तज्ज्ञांनी दिला.

ही काळजी घ्या...

  • ताप, सर्दी असेल तर मुलांना शाळेत पाठवू नका

  • नियमित मास्क वापरा

  • सातत्याने स्वच्छ पाण्याने हात धुवा

  • सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करा

हे करा

  • सर्दी, खोकला, ताप या लक्षणांनुसार औषधोपचार करावा

  • प्रतिजैविकांचा सर्रास वापर करू नये

  • पाणी, ताज्या फळांचा रस, सरबत असे द्रवपदार्थ आहारात घ्यावेत

कोरोनाची भीती नको, काळजी हवी

कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये १० ते १३ टक्के मुलांना कोरोनाचे निदान झाले होते. सर्दी, खोकला आणि त्याच वेळी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पण, बहुतांश तपासण्यांमधून कोरोना झाला नसल्याचे निदान झाले. त्यामुळे कोरोनाबद्दल भीती नको; पण काळजी हवी, असा सल्लाही बालरोगतज्ज्ञांनी दिला.

कोणी जास्त काळजी घ्यावी?

घरातील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांची प्रकर्षाने काळजी घ्यावी. कारण, लहान मुलांकडून विषाणूंचे संक्रमण ज्येष्ठ नागरिकांना होण्याचा धोका असतो. घरात लहान मुले सर्वाधिक आपल्या आजी-आजोबांजवळ असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

सर्दी-खोकल्याच्या तुलनेत उलट्या आणि जुलाबाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सुटीमध्ये बाहेर खाऊन आल्याने हवा बदल, पाणी बदल झाला. त्यातून पोटदुखी, मळमळणे, उलट्या, जुलाब यांचे प्रमाण मुलांमध्ये वाढले असल्याचे दिसते.

- डॉ. दुष्यंत कोठारी, बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :Patientchildrencold cough