पुणे आणखी गारठणार

पुणे आणखी गारठणार

पुणे - दिवसभर सुटलेल्या थंडगार वाऱ्याने महाराष्ट्र गारठत आहे. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याने पुढील चार दिवसांमध्ये थंडी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. पुण्यात दाट धुके पडेल, असेही खात्याने सांगितले. राज्यात सर्वांत कमी तापमान नाशिक येथे ९.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून दिवसाच्या तापमानाचा पारा वेगाने घसरत असल्याचे निरीक्षण वेधशाळेने नोंदविले. त्याच वेळी रात्री तापमानाचा पारा कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त नोंदला गेल्याचेही स्पष्ट केले.    

राज्यातील मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश या परिसरात चक्रावाताची स्थिती निर्माण झाल्याने राज्याच्या बहुतांश भागांत ढगाळ वातावरण होते. त्याचा थेट परिणाम तापमानाच्या वाढीवर झाला होता. या चक्रावाताचा प्रभाव कमी झाल्याने उत्तरेतून पुन्हा थंड वारे राज्याच्या दिशेने वाहत  आहेत. त्यामुळे राज्यात गारठा वाढत असल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली. दिवसभर हवामान कोरडे असल्याने आकाशही निरभ्र आहे. त्यामुळे दिवसा गारठा जावणतोच, पण रात्रीदेखील महाराष्ट्र थंडीने गारठत असल्याचे चित्र आहे.

कोकण
राज्यात किमान तापमानातील सर्वाधिक घट कोकणात झाली. या भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले असून, किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

मध्य महाराष्ट्र 
मध्य महाराष्ट्रातही थंडी कमीअधिक स्वरूपात आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सर्वांत कमी तापमान नाशिक येथे नोंदले गेले असले तरीही या भागात महाबळेश्‍वर वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांत थंडी कमी झाली. त्यामुळे किमान तापमान या भागात पुन्हा १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आले आहे. 

मराठवाडा
औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांच्या बहुतांशी भागांतही किंचित थंडी आहे. किमान तापमानाचा पारा १२ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. विदर्भातही गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागांत थंडी किंचित कमी झाली.

पुण्यात धुके दाटणार
पुणे परिसरात दोन दिवसांपासून पहाटे धुके पडत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये धुके आणखी दाट होईल, अशी शक्‍यता वर्तविली आहे. पुण्यात सध्या १२.१ अंश सेल्सिअस नोंदला गेलेला किमान तापमानाचा पारा पुढील दोन दिवसांमध्ये ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com