

लोगो : उद्योग बॅंक व्याख्यानमाला
---
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मालक नव्हे लोकसेवक बनावे
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन; ‘माझे ध्येय, संघर्ष तसेच यश’ वर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : कलेक्टर होण्यापूर्वी मी सीए होतो. सीए परीक्षेत टॉप रँक मिळवल्यानंतर विदेशात मोठी नोकरी मिळाली. दरमहा साडेसहा लाख रुपयांचे पॅकेज होते. मात्र, या नोकरीत मी समाधानी नव्हतो. हातात सुरक्षित नोकरी असतानाही समाधानाच्या शोधात होतो. याच वेळी मला कलेक्टर होण्याचा सल्ला मिळाला. त्यानुसार तयारी केली आणि तिसऱ्या प्रयत्नात आयएएस उत्तीर्ण झालो. सेवा म्हणून जिल्हाधिकारी पदाची नोकरी स्वीकारली. मालक न होता लोकसेवक बनल्याने समाधान मिळाले. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मालक न होता लोकसेवक बनावे, असा सल्ला सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला.
येथील फडकुले सभागृहात रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी तसेच उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी ‘माझे ध्येय, संघर्ष तसेच यश’ या विषयावर मंगळवारी (ता. १५) पहिले पुष्प गुंफले. डॉ. फडकुले सभागृहात सुरू असलेल्या या व्याख्यानमालेचे यंदा ६१ वे वर्ष आहे.
यावेळी व्यासपीठावर रोटरीचे प्रांतपाल जयेश पटेल, व्याख्यानमाला समितीचे प्रेसिडेंट यल्लादास लचमापुरे, अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, रोटरीचे सचिव श्रीनिवास नंदाल, अध्यक्ष नरसिंह कनकी, सिद्धेश्वर गड्डम आदी उपस्थित होते. प्रा. विठ्ठल वंगा यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले, प्रशासकीय सेवेची तयारी करताना तीन बाबींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ही नोकरी सेवा म्हणून स्वीकारा आणि सेवा करण्याची मानसिकता ठेवा. नवीन विषय स्वीकारण्याची आवड जोपासा आणि नवीन विषय आत्मसात करण्याची ताकद अंगी बाळगा. तसेच भाषा शिकण्याची तयारी ठेवा. जोपर्यंत स्थानिक भाषा शिकत नाही, तोपर्यंत संबंधित लोकांच्या अडचणी आणि समस्या समजून घेता येणार नाहीत.
---
चौकट
आजचे व्याख्यान
‘संतविचारांची दोन शिखरे... ज्ञानोबा व तुकोबा’ या विषयावर बुधवारी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यान सुरू होईल. स्थळ : फडकुले सभागृह.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.