जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कागदावर : नांदेड फाट्यावर वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कागदावर : नांदेड फाट्यावर वाहतूक कोंडी

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कागदावर : नांदेड फाट्यावर वाहतूक कोंडी

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : रस्त्याचे काम सुरू असल्याने सिंहगड रस्त्याला लागलेले वाहतूक कोंडीचे ग्रहण अद्यापही सुटले नसल्याचे दिसून येत आहे. रविवारच्या सुट्टीमुळे आलेल्या पर्यटकांमुळे नांदेड फाट्यावर तुफान वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत पुणे शहर पोलींचा वाहतूक विभाग व पुणे ग्रामीणचे हवेली पोलीस स्टेशन यांच्यात 'तू-तू मैं-मैं' सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सिंहगड रस्त्याचे किरकटवाडी फाटा व नांदेड फाट्यादरम्यान काम सुरू असल्याने सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दि. 18 नोव्हेंबर रोजी सिंहगड रस्त्यावरील वाहतूक वळविण्याचे आदेश काढले. सदर आदेशानुसार पुण्याकडून खडकवासला, सिंहगड, पानशेतकडे जाणाऱ्या पर्यटक व नागरिकांसाठी नांदेड सिटी गेट-नांदेड गाव-शिवणे-उत्तमनगर खडकवासला असा मार्ग ठरवण्यात आलेला आहे.

वाहतूक कोंडी झालेली असताना बघ्याची भूमिका घेऊन बसलेले पोलीस कर्मचारी

वाहतूक कोंडी झालेली असताना बघ्याची भूमिका घेऊन बसलेले पोलीस कर्मचारी

त्यासाठी नांदेड सिटी गेटसमोर खडकवासल्याकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलेला आहे; मात्र त्याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त न ठेवण्यात आल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांनी सरळ वाहने घातली. परिणामी नांदेड फाट्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी शहर वाहतूक विभागाकडे तर शहर वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी हवेली पोलीसांकडे बोट दाखवले आहे.

"वाहतूक वळविण्यात आली आहे परंतु पर्यटकांनी पुढे कसे जायचे हे सांगायला कोणी नाही. परिणामी पर्यटक नांदेड सिटीपासून फिरुन पुन्हा नांदेड फाट्यावर तेत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाने नियोजन करायला हवे." - अतुल कारले, नागरिक, नांदेड.

"पर्यटकांमुळे स्थानिकांचे हाल होत आहेत. शनिवार- रविवार अतिरिक्त बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे." - रुपेश घुले, नागरिक, नांदेड.

"नांदेड सिटी गेटजवळ शहर वाहतूक विभागाने बंदोबस्त वाढविणे गरजेचे आहे. ग्रामीण हद्दीत योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला आहे व वाहतूक खडकवासला धरणापासून वळविण्यात येत आहे. नांदेड सिटी जवळचा पॉईंट शहर वाहतूक पोलीसांनी सांभाळायला हवा." - सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

"दोन वाहतूक पोलीस नांदेड सिटी गेटसमोर तैनात करण्यात आलेले आहेत. नागरिक त्यांच्याशी वाद घालतात. हवेलीच्या पोलीस निरीक्षकांनी तेथे त्यांच्याकडील पोलीस तैनात करणे आवश्यक आहे. सर्व काम ग्रामीण हद्दीतच सुरू आहे." - राहुल श्रीरामे, उपायुक्त, पुणे शहर पोलीस वाहतूक विभाग.

loading image
go to top