राज्य सरकारच्या 50 टक्के कर माफीचा वाहनधारकांना फायदा; वाचा कोणाला मिळणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये व्यावसायिक वापराची बहुसंख्य वाहने जागेवर उभी होती. त्या वाहनांचा एक एप्रिल ते 31 डिसेंबर दरम्यानचा कर माफ करावा, अशी मागणी मालवाहतूकदार संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यासाठी वारंवार आंदोलनेही केली होती.

पुणे : व्यावसायिक वापराच्या ज्या वाहन मालकांनी मागील वर्षाचा वार्षिक कर 31 मार्चपूर्वी भरला आहे, त्यांनाच सध्याच्या वर्षी राज्य सरकारने केलेल्या 50 टक्के माफीचा लाभ मिळेल, असे परिवहन आयुक्त कार्यालयाने एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये व्यावसायिक वापराची बहुसंख्य वाहने जागेवर उभी होती. त्या वाहनांचा एक एप्रिल ते 31 डिसेंबर दरम्यानचा कर माफ करावा, अशी मागणी मालवाहतूकदार संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यासाठी वारंवार आंदोलनेही केली होती. बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाने (बोकी) त्यासाठी खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, परिवहन मंत्री अनिल परब आदींची भेट घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने गेल्या महिन्यांत व्यावसायिक वापराच्या वाहनांसाठी कर सहा महिन्यांसाठी माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यामध्ये या वर्षी 31 मार्चपर्यंत कर भरणा केलेल्या वाहनमालकांनाच कर माफी मिळेल, असा आदेश उपसचिव प्रकाश साबळे यांनी नुकताच दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वार्षिक कर भरणा करणारी मालवाहतूक वाहने, वार्षिक कर भरणारी पर्यटक वाहने, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅंपर्स वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस, वाहने, जेसीबी आणि तत्सम संवर्गातील वाहने यांना वार्षिक करात 50 टक्के सूट देण्यात आली आहे, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यातील सुमारे 8 लाख वाहनमालकांना 550 कोटी रुपयांचा दिलासा मिळाला आहे. या बाबत राज्य प्रवासी आणि मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, ""ज्या वाहनमालकांनी या वर्षी 31 मार्चपर्यंत टॅक्‍स भरला आहे, त्यांनाच पुढील वर्षी 31 मार्चपर्यंतच्या करात 50 टक्के सवलत मिळणार आहे. म्हणजेच 50 टक्के कर भरावा लागेल. वाहतूकदारांची ही मागणी अनेक दिवस प्रलंबित होती. मात्र, राज्य सरकारने त्याचा सकारात्मक विचार करून वाहतूकदारांना दिलासा दिला आहे.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commercial Vehicles can benefit from 50 percent tax exemption by the state government