कोरोनातून वाचला पण, नंतर त्यानं मरणालाच कवटाळलं!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

तो दौंड तालुक्‍यातील बोरी पार्धी (जि. पुणे) येथील रहिवासी. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करायचा. श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने गावी गेला.

पिंपरी/केडगाव : तो दौंड तालुक्‍यातील बोरी पार्धी (जि. पुणे) येथील रहिवासी. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करायचा. श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने गावी गेला. यवत येथील खासगी रुग्णालय गाठले. कोरोनाची लक्षणे दिसल्याने सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. त्यानुसार तो पिंपरी-चिंचवडमध्ये आला. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. उपचारानंतर पुन्हा तपासणी केली. रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे बुधवारी डिस्चार्ज मिळाला. तो सायंकाळी बोरीपार्धी येथे घरी गेला. पण, गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास गावाजवळील लोहमार्गावर त्याचा मृतदेह आढळला. त्याने आत्महत्या केली. धनंजय बापूराव सोनवणे (वय 45, रा. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे) यांची ही हृदयद्रावक कहाणी. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

धनंजय सोनवणे. त्यांचे मोठे बंधू शिवदास. धनंजय यांना 20 वर्षांची मुलगी आणि 18 वर्षांचा मुलगा आहे. ते एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करायचे. पत्नी गृहिणी. एकत्र कुटुंब. शेती हा प्रमुख व्यवसाय. वेळ मिळेल तेव्हा, ते गावी बोरीपार्धी येथे जायचे. 22 जून रोजी त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत होता. म्हणून ते गावी गेले. भावाने त्यांना केडगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. दोन दिवस तिथे उपचार केले. परंतु, प्रकृतीत फरक पडत नसल्याने 24 जून रोजी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. स्वॅब घेतले. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला. कोरोना पॉझिटिव्ह. उपचारानंतर बरे वाटल्यामुळे त्यांना 30 जून रोजी बालेवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. परंतु, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे पुन्हा वायसीएमला आणले. परंतु, प्रकृती चांगली असल्यामुळे व कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने त्यांना बुधवारी, एक जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या पुतण्याने त्यांना बोरीपार्धी येथे घरी नेले. रात्री नऊच्या सुमारास सर्वांनी जेवण केले. मात्र, गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता धनंजय घरात नसल्याचे लक्षात आले. सकाळी सहाच्या सुमारास माहिती मिळाली की, रेल्वेखाली कोणीतरी सापडले आहे. तिथे पाहिले तर, धनंजय यांचा मृतदेह आढळला, अशी खबर त्यांच्या भावाने यवत पोलिसांकडे दिली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आमच्या केडगावच्या बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय बापूराव सोनवणे (वय 45, रा. बोरीपार्धी) यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. त्यांच्या अहवालाबाबत ग्रामपंचायत रुग्णालयाकडून माहिती घेत आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सोनवणे हे पिंपरी-चिंचवड परिसरात एका खाद्यतेल कंपनीचे सेल्समन म्हणून काम करीत होते. कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने ते काही दिवस पिंपरी येथे मुक्कामाला होते. आजारी पडल्याने ते घरी आले होते. केडगावातील खासगी डॉक्‍टरांकडे त्यांनी दहा दिवसांपूर्वी तपासणी केली. डॉक्‍टरांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांनी त्यास सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला दिला. दवाखान्यान त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आला. पिंपरीतील वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. काल पुन्हा त्यांची चाचणी घेण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. काल रात्री ते बोरीपार्धीतील आपल्या घरी आले. गुरुवारी पहाटे बोरीपार्धी जवळील रेल्वेगेटच्या पुर्व बाजूला मृतदेह आढळला. त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. या घटनेमुळे बोरीपार्धी- केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्तणुकीत बदल... 

दरम्यान, बोरीपार्धीचे सरपंच व वायसीएममधील महिला अधिकारी यांच्यातील संभाषणाची क्‍लिप 'सकाळ'च्या हाती लागली आहे. त्यात महिला अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, धनंजय हे कोरोना पॉझिटिव्ह होते. परंतु, उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आम्ही काल नियमानुसार त्यांना घरी सोडले. परंतु, रुग्णालयात असताना त्यांच्या वर्तणुकीत फरक जाणवत होता. रोज रात्री तीन वाजता उठून 'छातीत घास अडकला आहे,' असे ते सांगायचे. इतक्‍या रात्री जेवण देत नसल्यामुळे आम्ही त्यांना पाणी प्या, असे सांगत असू. पाणी पिल्यावरही ते विचित्र वागायचे. त्यामुळे चोवीस तास त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: committed suicide below the train after being corona free at daund pune