
संत सावता महाराज यांची कर्मभूमी असलेल्या अरण तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबध्द असून तीर्थक्षेत्राचा अ वर्गात समावेश करण्यास प्राधान्य आहे.
अरण तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबध्द - अजित पवार
इंदापूर - संत सावता महाराज यांची कर्मभूमी असलेल्या अरण तीर्थक्षेत्राचा (Aran Shrine) सर्वांगीण विकास (Development) करण्यासाठी कटिबध्द असून तीर्थक्षेत्राचा अ वर्गात समावेश करण्यास प्राधान्य आहे. ओबीसी समाजाचा नियोजनबद्ध विकास महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार (Government) करत असून अरण चा अ वर्ग दर्जामध्ये समावेश करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनराव शिंदे,सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे व इतरांची लवकरच मंत्रालयात बैठक लावली जाईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य सावता परिषदेच्या वतीने तीर्थक्षेत्र अरण ( ता. माढा ) येथे पार पडलेल्या माळी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी ह भ प रमेश महाराज वसेकर,अरणचे राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू पृथ्वीराज घाडगे, रोशन दोरगे, पायल गाजरे, समृद्धी पवार, कुस्तीपटू काजल जाधव, सायली सोलंकर, प्राजक्ता सोलंकर यांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी श्री. पवार यांनी सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांचे भवितव्य उज्वल असल्याचेसूतोवाच करताच उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे उस्फुर्त स्वागत केले.
अजित पवार पुढे म्हणाले, ओबीसींना न्याय देण्या साठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असून संत सावता महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समतेच्या शिकवणी प्रमाणे आचरण करत आहे. संत सावता महाराजांच्या कर्मभूमीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या मदतीने विकास समिती स्थापन करून महाराजांच्या कर्मभूमीला ‘अ’ दर्जा मिळवून दिला जाईल असे सूतोवाच श्री. पवार यांनी केले.
सर्व संतांनी समतेची शिकवण दिली आहे मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गढूळ झाले आहे. मशिदी वरील भोंगे उतरवण्यापासून ते हनुमान चालीसा पठण करण्यापर्यंत राजकीय वातावरण तापलं आहे.कोरोना महामारी नंतर राज्यात रोजगाराची समस्या निर्माण झाली असून त्याकडे सर्वांनीलक्ष द्यायला हवं. धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं बंद व्हावं. भोंग्याचे राजकारण बाजूला ठेवूनलोकहिता साठी आवश्यक निर्णय घ्यायला हवेत, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेला लगावला आहे.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मार्गदर्शन केले.
सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी समाजाचा विकास साधण्यासाठी ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी, ओबीसी महामंडळाला आर्थिक सक्षम करावे, अरण येथे भक्तनिवास, शासनाने अरण तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी लागणारी जमीन शासनाने अधिग्रहित करावी, संतपीठ ग्रंथालय संशोधन व ध्यानधारणा केंद्र उभारावे अशा मागण्या केल्या.
स्वागत सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, इंदापूर तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी तर सूत्रसंचलन प्रदेश प्रवक्ते राजीव काळे यांनी केले. आभार सावता परिषदेचे सोलापुर जिल्हाध्यक्ष म्रुदुल माळी यांनी मानले.
यावेळी आमदार सतीश चव्हाण, शहाजी पाटील दीपक साळुंखे, संजय शिंदे, अमरसिंह पंडित, शंकरराव बोरकर, मयूर वैद्य, महादेव ताटे, गणेश दळवी, मनीषा सोनमाळी, गोरख भुजबळ स्वप्नील कोद्रे, चेतन वाघमारे, अनुज गायकवाड, प्रज्वल राऊत, अमर बोराटे, सचिन शिंदे, अजय गवळी उपस्थित होते.
Web Title: Committed To The Overall Development Of Aran Shrine Ajit Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..