
अपघातात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना ८० लाखांची नुकसान भरपाई
पुणे - भरधाव आलेल्या जीपने धडक दिल्यामुळे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराच्या कुटुंबीयांना ८० लाख सहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा निकाल आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने दिला आहे. या रकमेवर दावा दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक सात टक्के व्याज देण्याचेही निकालात नमूद आहे.
न्यायप्राधिकरणाचे सदस्य सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांनी याबाबत जून २०१७ साली ॲड. आशिष पटनी आणि ॲड. अनिल पटनी यांच्यामार्फत न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. ३२ वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्यावतीने २६ वर्षीय पत्नी, सहा वर्षाच्या दोन मुली आणि वृद्ध आई वडिलांनी हा दावा दाखल केला होता. जीपचे मालक आणि विमा कंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिडेटच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता.
दुचाकीस्वार हे एप्रिल २०१७ रोजी शिक्रापूर पाबळ रस्त्यावरून दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या जीपने त्यांना धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र उपचार सुरू असतानाच २८ मे २०१७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी तब्बल १४ लाख रुपये खर्च आला. ते सणसवाडी येथील एका कंपनीत कामाला होते. त्यांना दरमहा ४० हजार रुपये पगार होता. पगार आणि अवलंबून असलेल्या पाच व्यक्तीचा विचार करून ९० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली. ॲड. पटनी यांनी उत्पन्न सिद्ध करण्यासाठी मयत नोकरदार काम करत असलेल्या कंपनी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष नोंदवली.
Web Title: Compensation Of 80 Lakhs To Families Of Those Who Died In The Accident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..