मंगलदास बांदल यांच्यावर आणखी एक गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

राजकीय रंग येण्याची चिन्हे... 
मागील आठवड्यात शिरूर येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात अपंग महिलांच्या तक्रारीनंतर मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. कालच्या गुन्ह्यातील फिर्यादी हे शिवसेना ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता पक्षीय रंगही येण्याची चिन्हे आहेत.

शिक्रापूर - जमीन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा शिक्रापूर पोलिसांकडे दाखल झाला आहे. फिर्यादी हे शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण सेलचे उपजिल्हाप्रमुख किरण देशमुख आहेत. 

मागील आठवड्यात ८ जुलै रोजी शिरूर पोलिस ठाण्यामध्ये बांदल यांच्यावर अशाच पद्धतीचा एक गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या आवाहनानुसार दुसरी तक्रार दाखल झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. किरण देशमुख यांची २१ गुंठे शेती पुणे-नगर महामार्गावरील खंडाळे (ता. शिरूर) येथे होती. ती विकायची असल्याने याबाबत बांदल आणि देशमुख यांच्यात २७ लाखांना व्यवहार ठरला. मात्र, प्रत्यक्ष खरेदीखतावेळी श्रीकांत ज्ञानोबा विरोळे-पाटील (शिक्रापूर, ता. शिरूर) व राहुल वसंत टाकळकर (हिवरे, ता. शिरूर) यांच्या नावाने खरेदीखत करून देण्याबाबत बांदल यांनी देशमुख यांना सांगितले व दोन दिवसांनी पैसे देतो, असे सांगितले. त्यानुसार हा व्यवहार १९ मे २०१० रोजी झाला. ठरल्याप्रमाणे देशमुख दोन दिवसांनी २१ मे २०१० रोजी बांदल यांच्याकडे पैशांसाठी गेले असता ते घरी नसल्याचे निदर्शनास आले. मग देशमुख यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत पैशांसाठी खरेदीदार श्रीकांत विरोळे-पाटील व या व्यवहारातील साक्षीदार राहुल टाकळकर यांच्याकडे विचारणा सुरू केली. 

या दोघांनीही दाद दिली नाही. झालेल्या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने देशमुख यांनी या प्रकरणी २०१० पासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पाटील यांची त्यांनी पुण्यात भेट घेतल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार मंगलदास बांदल, श्रीकांत विरोळे-पाटील व राहुल टाकळकर यांच्यावर सोमवारी (ता. १५) रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा शिक्रापूर पोलिस स्टेशनला दाखल झाला. अधिक तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint on mangaldas Bandal Crime