पुण्यातील नदी संवर्धन प्रकल्प तातडीने पुर्ण करा : बापट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापट

पुण्यातील नदी संवर्धन प्रकल्प तातडीने पुर्ण करा : बापट

नवी दिल्ली : पुण्यातील (Pune) मुळा-मुठा (mula mutha) नद्या या सर्वाधिक प्रदूषित आहेत. त्यांच्या स्वच्छतेसाठी मंजूर केलेला प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. नद्यांमधील प्रदूषित पाण्यामुळे पुणेकरांच्या (pune) आरोग्याला धोका आहे. त्यामुळे नदी संवर्धन प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी खासदार आणि संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष गिरीश बापट (girish Bapat) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन प्रदूषित नद्यांच्या समस्येकडे त्यांनी लक्ष वेधले. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्राने तातडीने पावले उचलण्याची मागणी त्यांनी शेखावत यांच्याकडे केली आहे.

बापट म्हणाले, "पुण्यातील मुळा-मुठा नदी सर्वात प्रदूषित नद्यांपैकी आहे. नदीत टाकलेले सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषकांचे प्रमाण त्याला कारणीभूत आहे. निवासी भागात कचरा विलगीकरण होत नाही. तसेच उद्योगांमध्ये तयार होणारे प्रदूषित पाणी नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया किंवा ते फिल्टर केले जात नाही. त्याचा सागरी जीवाला गंभीर धोका निर्माण होतो आहे. पाण्याचा रंगही निळा न राहता, काळसर राखाडी झाला आहे."

हेही वाचा: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गोणपाटाचा पोषाख केलेल्या फोटोची स्टोरी

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या नद्यांना उच्च धोका श्रेणीत म्हणजेच प्राधान्य 1 म्हणून वर्गीकृत केले आहे. पुण्यातील नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यांमुळे जलजन्य आजारांचाही धोका आहे. पुणे महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया न केलेले 125 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी नदीत सोडले जाते. परिणामी, प्रदूषणाची पातळी वाढल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याच्या गुणवत्तेचे वर्गीकरण चतुर्थ श्रेणीमध्ये केले आहे, असे याकडे बापट यांनी लक्ष वेधले.

मुळा-मुठा नदीच्या स्वच्छतेसाठी एक प्रकल्प 2016 मध्ये मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत हा मंजूर प्रकल्प केंद्र सरकारने 2022 मध्ये पूर्ण करणे नियोजित आहे. केंद्र सरकार आणि पुणे महापालिका यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. मात्र, आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असे स्पष्ट करीत त्या प्रकल्पाला वेग द्यावा आणि तो लवकर पूर्ण करावा, असे बापट म्हणाले.

हेही वाचा: बेरोजगार तरुणाईच्या हाताला मिळाले काम

नदी संवर्धन प्रकल्प हा प्रदूषणाशी संबंधित आहे. त्याचा पुण्याच्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. म्हणून हा प्रकल्प जलद गतीने राबवावा. जेणेकरून तो प्राधान्याने पूर्ण होईल. तसेच पुणे शहराचे स्वच्छ नदीचे स्वप्नही लवकर पूर्ण होईल, अशी विनंती बापट यांनी केंद्रीय मंत्री शेखावत यांच्याकडे केली आहे.

Web Title: Complete Mula Mutha River Conservation Project Immediately Bapat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..