पुणे - कोथरुड येथे रस्त्यावरील गर्दीतुन वाट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वार संगणक अभियंत्यास तीन सराईत गुन्हेगारांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरुडमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मारहाण झालेला तरुण हा भाजपचा कार्यकर्ता आहे, तर त्यास मारहाण करणारे तिघेही कोथरुडमधील एका गुंड टोळीतील सराईत गुन्हेगार आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.
देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय ३३, रा. कोथरूड) असे जखमी झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. तर, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू ( वय ३५, रा.शिंदे चाळ , संजय चौक शास्त्रीनगर, कोथरूड), किरण कोंडीबा पडवळ ( वय ३१, रा. शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड), अमोल विनायक तापकीर (वय ३५, रा. लालबहाद्दूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जोग यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींविरुद्ध मारहाणीसह खुनाच्या प्रयत्नाचे कलम पोलिसांनी लावले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्री शिवजयंतीनिमित्त मिरवणुक काढण्यात आली होती. त्या दिवशी जोग यांना सुट्टी असल्याने ते आपल्या दुचाकीवरुन खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. खरेदी झाल्यानंतर ते पुन्हा घरी येत होते. त्यावेळी समोरुन मिरवणुक येत होती. त्यावेळी रस्त्यावरील गर्दीतुन वाट काढत जोग त्यांची दुचाकी पुढे नेत होते.
त्याचवेळी तिघांनी त्यांना अडविले. "तुला नीट दुचाकी चालविता येत नाही का ? ' अशा शब्दात त्यांना दमदाटी करून तिघांनी बेदम मारहाण केली. या घटनेत नाकावर ठोसा बसल्याने जोग गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती त्यांनी त्यांच्या वडीलांना दिली, त्यानंतर जखमी अवस्थेतच त्यांनी कोथरुड पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. जोग यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी धर्मजिज्ञासू, पडवळ व तापकीर यांना शुक्रवारी (ता.२२) न्यायालयात हजर केले. आरोपी सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती व दहशतीमुळे नागरीक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तीवाद सरकारी पक्षाने केला, तर किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल असताना जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही, असा युक्तीवाद आरोपींचे वकील ऍड.विजयसिंह ठोंबरे यांनी केला. दोन्ही बाजुंचे युक्तीवाद ऐकुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एच.वानखेडे यांनी आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस आयुक्त आता तरी गंभीर विचार करणार का? - मुरलीधर मोहोळ
सराईत गुन्हेगारांकडुन मारहाण केलेला देवेंद्र जोग हा तरुण माझ्या कार्यालयात कामाला नाही, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. नागरीक, कार्यकर्त्यांसह पोलिसांवरही पुण्यात प्राणघातक हल्ला होत असेल, तर पोलिसांनी कडक भूमिका घेतली पाहीजे.
पुणे पोलिस आयुक्तांनी आता तरी गंभीर विचार करावा. पुण्यात गुन्हेगारी खपवुन घेणार आहे, याबाबत पोलिसांना आता कडक सुचना देत आहे, गुन्हेगार समाजमाध्यमांवर रिल्सद्वारे दहशत पसरवता, तेव्हा पुणे पोलिस डोळे बंद करून घेतात का ?, अशा शब्दात केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पुणे पोलिसांना सज्जड दम भरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.