Pune Rains : मानाजीनगर ओढ्याच्या पुरात कॉम्प्युटर इंजिनिअरचा बळी; एक बेपत्ता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पावसाच्या हाहाकारात पुण्यातील बळींची संख्या सहावर पोचली आहे. यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा, तर एका कॉम्प्युटर इंजिनिअरचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. ते म्हात्रे पुलाकडील एसएमएस कॉनकास्ट कंपनीत कामाला होते. काम आटोपून रात्री घरी जात असताना ही घटना घडली. मृत्यूंचा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 
 

पुणे : पावसाच्या हाहाकारात पुण्यातील बळींची संख्या सहावर पोचली आहे. यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा, तर एका कॉम्प्युटर इंजिनिअरचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. ते म्हात्रे पुलाकडील एसएमएस कॉनकास्ट कंपनीत कामाला होते. काम आटोपून रात्री घरी जात असताना ही घटना घडली. मृत्यूंचा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

पुण्यातील नऱ्हे भागातील मानाजीनगर ओढ्याच्या पुराचा तडाखा लगतच्या भागाला बसला. बुधवारी (ता. 25) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मानाजीनगर कुटे मळा येथे ओढ्याला आलेल्या पुरात एकाच सोसायटीतील सहा जण वाहून गेले. त्यात खासगी कंपनीत कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या मच्छिंद्र बहुले (वय 38, रा. साईपूरम सोसायटी, मानाजीनगर, नऱ्हे) हे काम आटोपून दुचारीवरून घरी निघाले होते. रस्त्यात कुटे मळा येथे मोठा पूर आला होता. ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. त्यांचा मृतहेद आज सकाळी ओढ्यात सापडला. त्यांच्यासोबत असलेले मुकेश लोहार (वय 30, रा. साईपूरम सोसायटी) हे अद्याप बेपत्ता आहेत. तसेच सुरज शिंदे, सौरभ आदक, घनश्‍याम लोहार, सुनील काळसे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री नऊ वाजता घडली; मात्र अद्याप तेथे कोणतेही मदत कार्य पोहोचले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

नऱ्हे टेकडी येथून हा ओढा सुरू होतो. स्वामीनारायण मंदिर, जीएसपीएम कॉलेज, नऱ्हे गाव, मानाजीनगर, कुटे मळा येथून तो पुढे नवले हॉस्पिटलजवळून जातो. ओढ्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहे. त्यामुळे पाणी वाढल्यास ते लगतच्या वस्तीत घुसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A computer Engineer death in flood near manaji nagar canal causes due to Pune Rains