‘प्रकाशा’च्या प्रदूषणाबाबत चिंता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

‘प्रकाश’च्या प्रदूषणाचे दुष्परिणाम

  • वनस्पती आणि प्राण्यांमध्ये जनुकीय बदल
  • प्राण्यांच्या झोपण्याच्या कालावधीवर दुष्परिणाम
  • निशाचर प्राणी आणि पक्ष्यांच्या जीवनपद्धतीत बदल
  • मानवाला लठ्ठपणा, औदासीन्य, झोपेचे विकार, मधुमेह, स्तनाचा कर्करोग आदी विकार

पुणे - वायू, जल, ध्वनिप्रदूषणाबरोबरच ‘प्रकाश’प्रदूषणातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी पूर्वीसारख्या काळोख्या रात्रीचे ठिकाण आता उपलब्ध नाही. उंच इमारती,  प्रकाशाची आरास, यामुळे मोठ्या प्रमाणावर ‘प्रकाश’प्रदूषण होत आहे. माणसांबरोबरच प्राणी-पक्ष्यांनाही याचा धोका आहे, असा चिंताजनक सूर द्वितीय इंडो-चिली खगोलशास्त्र परिसंवादानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी व्यक्त केला आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रामध्ये (आयुका) पार पडलेल्या तीन दिवसीय परिसंवादात भारतातील चिलीचे राजदूत जॉन अंगुलो, क्रिस्टेन डेव्हिस, आयुकाचे संचालक प्रा. सोमंक रायचौधरी, परिसंवादाचे समन्वयक प्रा. रंजन गुप्ता, भारतीय खगोलशास्त्र संस्थेचे प्रा. जयंत मूर्ती, डॉ. सी. जी. अनुपमा उपस्थित होते.

डॉ. अनुपमा म्हणाल्या, ‘‘देशामध्ये आकाशनिरीक्षणासाठी लडाख हा सर्वांत चांगला प्रदेश आहे. उर्वरित देशामध्येमोठ्या प्रमाणावर प्रकाशाचे प्रदूषण झाले आहे. आम्ही यासंबंधी  उपाययोजनांसाठी पाठपुरावा करीत आहोत.’’

जगामधील सर्वोत्तम वेधशाळा चिलीमध्ये आहे. वाढत चाललेले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, खगोलशास्त्रीय अभियांत्रिकी, यांसाठी परस्परसहकार्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आल्याचे प्रा. रायचौधरी यांनी सांगितले.

मानवी उपयोगासाठी खगोलशास्त्रीय संशोधन
मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी खगोलशास्त्रातील संशोधनाचा फायदा होतो. आपल्या हातातील मोबाईल, वैद्यकीय उपकरणे, दळणवळण आणि घरगुती वापरातील अनेक साधने हे अवकाश संशोधनाचेच देणे आहे. मूलभूत संशोधनाचा फायदा लगेच दिसत नसला, तरी भविष्यात त्याचा दूरगामी फायदा होतो., असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.

जगातल्या अर्ध्यापेक्षा जास्त वेधशाळा चिलीमध्ये आहेत. खगोलशास्त्रीय संशोधनाचा वाढता आवाका लक्षात घेता शिक्षण, संशोधन आणि औद्योगिक सहकार्यासंबंधीची चर्चा द्विपक्षीय परिसंवादात करण्यात आली.
- प्रा. सोमंक रायचौधरी, संचालक, आयुका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concerns about light pollution