Pune : डांबरी माल न मिळाल्याचे कारण देत खड्डे बुजविण्यासाठी वापरले काँक्रीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डांबरी माल न मिळाल्याचे कारण देत खड्डे बुजविण्यासाठी वापरले काँक्रीट

डांबरी माल न मिळाल्याचे कारण देत खड्डे बुजविण्यासाठी वापरले काँक्रीट

कात्रज : कात्रज कोंढवा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याची वृत्तमालिका मागील आठवडाभरापूर्वी सकाळने प्रसिद्ध केली होती. मात्र, या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याच्या नावाखाली महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी डांबरी माल न मिळाल्याचे कारण पुढे करत रस्त्यांवर काँक्रीट टाकले आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. खड्ड्यात काँक्रीट टाकल्याने रस्ता आणखीनच खराब होत असून खडीमुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे.

कात्रज-कोंढवा रस्ता हा डांबरी रस्ता आहे. त्यामुळे त्या रस्त्यांवरील खड्डे बुजविताना डांबर टाकणे गरजेचे असताना महापालिकेकडून काँक्रीट टाकून दुरुस्ती करण्यात येत असल्याने पाय दुखत असेल तर पाय कापून टाकण्यासारखे उपाय महापालिकेकडून करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यांवर टाकण्यात आलेल्या काँक्रीटमध्ये पाणी जास्त झाले असून पाण्याद्वारे त्यातील सिमेंट वाहून जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खड्ड्यात केवळ खडी राहत असून ती अपघाताला आमंत्रण ठरणार आहे.

खड्डे बुजविण्यास सांगतले होते. परंतु, डांबरी माल न मिळाल्याने कामगारांनी रस्त्यांवर काँक्रीट टाकले आहे. लोकांना त्रास नको म्हणून ते काँक्रीट काढून घेण्यात येईल आणि रस्त्यांवर डांबरी माल टाकून खड्डे बुजविण्यात येतील.

- धनंजय गायकवाड, उपअभियंता, पथविभाग

कात्रज कोंढवा रस्त्याची आधीच दुरवस्था झाली आहे. त्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. तसेच उपाय करण्याचे योजिले तर अशा विचित्र प्रकारचे उपाय महापालिकेकडून करण्यात येतात. नागरिकांचा कररुपी पैशांची अक्षरशः धुळधाण चालली असल्याचे यातून दिसून येते

. - कैलास महाकुंडे, स्थानिक नागरिक

रोज या रस्त्यांवरून मी प्रवास करतो. महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आधीच मणके तुटण्याची वेळ आली असता आता तर महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या नावाखाली डांबरी रस्त्यांवर काँक्रीट टाकले आहे. यामुळे धोका आणखीनच वाढला आहे

.- किशोर कसबे, दुचाकीचालक

loading image
go to top