Pune : माजी स्थायी समिती अध्यक्षांचा बैठकीत गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation
पुणे : माजी स्थायी समिती अध्यक्षांचा बैठकीत गोंधळ

पुणे : माजी स्थायी समिती अध्यक्षांचा बैठकीत गोंधळ

पुणे - पद्मावती येथील महापालिकेच्या पोटे दवाखान्यामध्ये सीटी स्कॅन मशिन बसवण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी दाखल केल्यानंतर त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय न घेतल्याने माजी स्थायी समिती अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्‍विनी कदम यांनी जोरदार गोंधळ घालून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

खासगी दवाखान्यात सिटी स्कॅन महाग असल्याने महापालिकेतर्फे सिटी स्कॅन मशिन खरेदी करण्यासाठी अश्‍विनी कदम यांनी प्रस्ताव ठेवला आहे. त्यामध्ये ‘स’ यादीतून २ कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. तर प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या निधीतून ३१ लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव लोकांच्या हिताचा असल्याने त्यास त्वरित मंजुरी मिळेल असे कदम यांना वाटले, मात्र, स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर न करता पुढच्या बैठकीपर्यंत तो पुढे ढकलण्यात आला.

हा प्रकार घडल्यानंतर कदम यांना संताप अनावर झाला, त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली. त्यांचा आवाज चांगलाच वाढल्याने महापालिकेत याची चर्चा रंगली.

वैद्यकीय महाविद्यालय अद्याप सुरु झालेले नाही. असे असताना एक महिला नगरसेवक म्हणून काम करताना प्रकल्प अडवले जात आहेत. यापूर्वी देखील माहिती घेण्याच्या नावाखाली माझे प्रस्ताव अडविण्यात आले आहेत, असा आरोप कदम यांनी केला.

हेही वाचा: Pune : राज्यातील शिक्षकांचे होणार वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण

‘स्थायी समितीची बैठक संपत आली असताना अश्विनी कदम यांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला होता. त्यामुळे याची माहिती द्यावी अशी मागणी काही नगरसेवकांनी केल्याने हा प्रस्ताव दाखल करून पुढच्या बैठकीत मान्य केला जाईल.’

- हेमंत रासने- स्थायी समिती अध्यक्ष

ठाकरे रुग्णालयात डायलिसिस केंद्र

कोंढवा येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात न्यू ग्लोबल फाउंडेशनसोबत करार करून १० खाटांचे डायलिसिस केंद्र पीपीपी तत्त्वावर सुरू करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. खासगी रुग्णालयात महागडे उपचार असल्याने ते गरीब नागरिकांना परवड नाहीत, त्यामुले डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रति डायलिसिस ३५७ रुपये दर आकारण्यात येणार आहे. हा प्रकल्प दहा वर्षांच्या मुदतीच्या कराराने चालविण्यात येणार आहे, असे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

कोरेगाव-भीमा येथील स्मारकासाठी एक कोटी

कोरेगाव-भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसरात सुशोभीकरण आणि इतर विकासकामे करण्यासाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. हा प्रस्ताव नगरसेवक राहुल भंडारी यांनी दिली होता, त्यास मान्यता दिल्याचे रासने यांनी सांगितले.

loading image
go to top