रद्द गाड्यांच्या आरक्षित तिकीटांचा गोंधळ; प्रवासी वैतागले

सकाळ वृृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी गाड्यांचे आरक्षण निश्चित होत असल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. त्याचप्रमाणे रद्द केलेल्या काही गाड्यांचे आरक्षण इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे रेल्वेची यंत्रणा अद्ययावत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ​

पुणे : रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी गाड्यांचे आरक्षण निश्चित होत असल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. त्याचप्रमाणे रद्द केलेल्या काही गाड्यांचे आरक्षण इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे रेल्वेची यंत्रणा अद्ययावत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुणे ते मुंबईदरम्यानच्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेस १६ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही लांबपल्याच्या गाड्याही रद्द झाल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. या गाड्यांसाठी प्रवाशांनी काही दिवस आधीपासून आरक्षण केले आहे. अनेक प्रवाशांचे तिकीट निश्चित झालेले नाही. गाडी सुटण्याच्या वेळेच्या चार तास आधीपर्यंत हे तिकीट निश्चित होते. पण प्रतिक्षायादी प्रवाशांची संख्या जास्त असल्यास तिकीट निश्चित होत नाही. तर गाडी रद्द केल्यानंतर आरक्षण झालेले व प्रतिक्षा यादीत असलेल्या प्रवाशांची तिकीटे आपोआप रद्द होतात. पण मागील काही दिवसांत रद्द झालेल्या गाड्यांचे आरक्षण निश्चित झाले असल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. 

इंटरसिटी एक्सप्रेस (१२१२७) दि. १६ ऑगस्टपर्यंत रद्द असली तरी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ही गाडी१४  ऑगस्टपर्यंतच रद्द असल्याचे दाखविण्यात आले आहे. दरम्यान. १५ व १६ ऑगस्टला या गाडीच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच पुणे ते मुंबईदरम्यानच्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. पण अद्याप प्रगती व डेक्कन एक्सप्रेस अधिकृतपणे रद्द केली नसल्याचे रेल्वेच्या संकेतस्थळावर दिसत आहे. या दोन्ही गाड्या आरक्षणासाठी दि. १६ तारखेपर्यंत उपलब्ध असल्याचे दिसत होते. त्यामुळे प्रवासी या गाड्यांचे आरक्षण करू शकतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion of reserved tickets for canceled trains