esakal | पुण्यातील 'या' तीन तालुक्यांसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये चढाओढ
sakal

बोलून बातमी शोधा

ncp and congress leaders to meet ajit pawar

पुण्यातील 'या' तीन तालुक्यांसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये चढाओढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेल्हे (पुणे) : भोर, वेल्हा आणि मुळशीच्या विविध विकास कामांसंदर्भात आमदार संग्राम थोपटे यांनी तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे व वेल्हे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी देखील मुंबईत मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकाच वेळी उपमुख्यमंत्र्यांना भेटल्याने तालुक्यातील विकास कामांबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: राज्याचा मोठा निर्णय; आमदारांना मिळणाऱ्या विकासनिधीमध्ये वाढ

या बैठकीत गुंजवणी व भाटघर, वीर तसेच निरादेवघर धरणग्रस्थांच्या विविध प्रश्नासंदर्भात, भाटघर, वीर प्रकल्पग्रस्तांना १८ नागरी सुविधा पुरविणे, प्रकल्पग्रस्तांचे दाखले देणे, भाटघर प्रकल्पातील मौजे वाकांबे ते राजघर या दोन गांवाना जोडणारा पुल बांधणे, वांगणी,वाजेघर, शिवगंगा खो-यातील सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून त्यास मान्यता देणे, गुंजवणी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी शेत जमिन देणे,

बंद पाईपलाईनमुळे घेणा-या शेतीचे तसेच पिकांचे नुकसान भरपाई मिळणे, निरादेवघर प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचेे सर्वेक्षण पुर्ण झाले असुन त्यामध्ये सुधारीत सर्वेक्षण करून मौजे महुडे भानुसदरा येथील वंचित क्षेत्राला मान्यता देवून सुधारीत मान्यता देणे, निरादेवघर विभागाची मोकळी जागा धानवली गावाच्या पुनर्वसनासाठी देणे इ.महत्वपुर्ण विषयांवर बैठक घेतली.

हेही वाचा: MPSC 2020 : सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

या विषयांबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनीही पवार यांची भेट घेऊन त्यांना विविध विकासकामांबाबत निवेदन दिले. हे चित्र पाहता भोर-वेल्हा-मुळशीच्या विकासाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रस्सीखेच चालल्याचे दिसून येत आहे.

सर्व विषयांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेवून याबाबतच्या संबधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. याप्रसंगी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे,जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष किरण राऊत, जिल्हा चिटणीस तानाजी मांगडे, वेल्हे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष रेणुसे, कार्याध्यक्ष संदीप खुटवड, वेल्हे युवक अध्यक्ष प्रमोद लोहकरे, प्रदीप मरळ, सर्वेश सुतार व संबधित अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

loading image
go to top