कॉंग्रेसला राम, ग्राम आणि काम या गोष्टींचा तिटकारा — कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची टीका
काँग्रेसला राम, ग्राम आणि काम याचा तिटकारा
कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची काँग्रेसवर जोरदार टीका
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ४ ः मनरेगा योजना वाचविण्यासाठी काँग्रेसकडून केले जाणारे आंदोलन म्हणजे ‘भ्रष्टाचार बचाव संग्राम’ असल्याची टीका केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. काँग्रेसला राम, ग्राम आणि काम या गोष्टींचा तिटकारा असल्याची टिपणीही त्यांनी केली. मनरेगा योजनेत असंख्य सुधारणा करत केंद्र सरकारने अलीकडेच संसदेत नवीन कायदा मंजूर केला होता. ‘व्हीबी जी राम जी’ या नावाने आणलेल्या केंद्राच्या कायद्याविरोधात काँग्रेस सोमवारी आंदोलन करणार आहे.
‘‘काँग्रेसच्या डीएनएमध्ये भ्रष्टाचार आहे. मनरेगा योजनेवेळी मशिन आणि ठेकेदारांच्या मदतीने काम करत खिसे भरण्याचे काम करण्यात आले. एकच रस्ता दोन-तीन वेळा बनवला जात असे. योजनांमध्ये ८० वर्षांवरील लोक काम करत आणि नाल्यांच्या सफाईचे काम केल्याचे दाखवत पैसा हडप करत. काँग्रेस सरकाराच्या कार्यकाळात मनरेगा योजनेसाठी दोन लाख कोटी रुपये देण्यात आले. मग एकतरी कायमस्वरूपी मालमत्ता तयार झाली का? असल्यास काँग्रेसने दाखवून द्यावे,’’ असे चौहान म्हणाले.
खोटा प्रचार
‘‘अर्धे ऐकत पूर्ण खोटे पसरवणारे लोक म्हणजे काँग्रेसवाले,’’ असा टोला कृषी मंत्री चौहान यांनी लगावला. ते म्हणाले, ‘‘मनरेगा पेक्षा ‘जी राम जी’ योजना चांगली असल्यामुळे काँग्रेसवाल्यांच्या पोटात दुखत आहे. भ्रष्टाचार बंद होणार, हे खरे त्यांचे दुखणे आहे. ‘जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून शंभर ऐवजी सव्वाशे दिवसांच्या कामाची हमी देण्यात आली आहे. कामावर उशिराने येणाऱ्या मजुरांना दंड भरावा लागेल. मजुरांना केंद्रीभूत ठेवत नवीन कायदा तयार करण्यात आला आहेच पण गावांमध्ये कायमस्वरूपी राहतील, अशी विकासकामे केली जाणार आहेत. भ्रष्टाचाराची शक्यता मावळल्यामुळे संसदेत कायद्यावर चर्चा झाली तेव्हा राहुल गांधी हे गायब झाले होते. आरोप करा आणि पळून जा, ही आता काँग्रेसची सवय बनली आहे.’’
६० दिवसांसाठी योजना बंद असेल
‘‘ज्यावेळी शेतीची कामे मोठ्या प्रमाणात असतात, अशावेळी ६० दिवसांसाठी ‘जी राम जी’ योजनेचे काम बंद ठेवले जाणार आहे. शेती आणि रोजगार यामध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे. उर्वरित ३०५ दिवसांपैकी १२५ दिवस मजुरांना रोजगाराचा हक्क मिळेल. शेतकरी आणि मजूर अशा दोन्ही घटकांचा त्यामुळे फायदा होईल. ‘जी राम जी’ योजनेत काम करणाऱ्या मजुरांना १५ दिवसांच्या आत कामाचे वेतन दिले जाईल. तसे झाले नाही तर भरपाईची रक्कम दिली जाणार आहे,’’ असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

