Vidhan Sabha 2019 : रवींद्र धंगेकर म्हणताहेत, मी चुकलो पण...

ज्ञानेश सावंत
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

काँग्रेसमधील जुन्या नेत्यांशी जुळवूून घेत गेल्या दोन वर्षांपासून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढण्याची तयारी त्यांनी केली. तसा शब्दही कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्याचे धंगेकर सांगतात. परंतु, काँग्रेसमधील त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी अरविंद शिंदे यांनी बाजी मारून कसब्याची उमेदवारी मिळविली.

पुणे : महापालिकेच्या निवडणुकांत भल्याभल्यांना पराभवाची धूळ चारून 'जायंट किलर' ठरलेल्या नगरसेवक रवींद्र धंगेकरांवर आजघडीला कपाळावर हात मारून घेण्याची वेळ ओढविली आहे. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सोडून काँग्रेसच्या हातात हात घालण्याची वेळ चुकल्याचा मनस्ताप धंगेकरांना होऊ लागला असून, काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय चूक ठरल्याचे ते आता खासगीत बोलू लागले आहेत. मात्र, 'कसब्यातून लढायचे, तो जिंकायचाच,' यावर धंगेकर ठाम आहेत. महापालिकेपाठोपाठ विधानसभा निवडणूकही धंगेकर आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. 

महापालिकेच्या 1997 च्या निवडणुकीपासून आपली विजयी घोडदौड राखलेल्या धंगेकरांनी 2009 मध्ये पहिल्यांदा मनसेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढविली. तेव्हा खासदार गिरीश बापट यांना जोरदार टक्कर देत, धंगेकरांनी कसब्यातील मतदारांची पसंती मिळविली. त्यापाठोपाठ 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत धंगेकर मागे पडले. त्यानंतर मात्र सावध पावले टाकून धंगेकरांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले. तेव्हा त्यांना कॉंग्रेसचा पाठिंबा मिळविला. त्यानंतर ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून सभागृहात काम करू लागले.

काँग्रेसमधील जुन्या नेत्यांशी जुळवूून घेत गेल्या दोन वर्षांपासून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढण्याची तयारी त्यांनी केली. तसा शब्दही कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्याचे धंगेकर सांगतात. परंतु, काँग्रेसमधील त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी अरविंद शिंदे यांनी बाजी मारून कसब्याची उमेदवारी मिळविली. त्यामुळे धंगेकर अस्वस्थ झाले असून, मनसेचेही उमेदवारी जाहीर झाल्याने आता काय करायचे ? या कोंडीत ते सापडले आहेत. बंडाचे निशाण फडकावत ते आता अपक्ष म्हणून कसब्यातून नशीब अजमाविणार आहेत. 

कसब्यातील लोकांना आपला माणूस हवा आहे. तो त्यांना मिळवून देण्यासाठी मला निवडणूक लढवावीच लागणार आहे. काँग्रेसने तिकिट दिले नाही. त्याचा फार काही विचार न करता आता अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहे, असे धंगेकररांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Ravindra Dhangekar disappointed after not given candidateship in Kasba Pune