Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्ह्यात युतीची वर्चस्वाची तर आघाडीची अस्तित्वाची लढाई

मंगेश कोळपकर
Saturday, 19 October 2019

पुणे जिल्हा हा आजवर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून युतीने जिल्ह्यात मुुसंडी मारली आहे. तर तो पुन्हा मिळविण्यासाठी आघाडीचा प्रयत्न सुरू आहे. शहर- जिल्ह्यात प्रचारासाठी भाजप- शिवसेनेने राष्ट्रीय नेत्यांची फळीच मैदानात उतरविली आहे तर, आघाडीचे विविध नेतेही मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

पुणे : शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील 21 विधानसभा मतदारसंघांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप - शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे तर, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी अस्तित्त्वाची लढाई निकराने लढत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे यांना त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात आव्हान निर्माण झाले आहे. तर कोथरूड, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, मावळ, खेड आणि चिंचवडमधील लढती आता लक्षवेधक असतील. अखेरच्या टप्प्यात होत असलेले पक्षांतर, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, शह-काटशहाचे राजकारण या मुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे.

पुणे जिल्हा हा आजवर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून युतीने जिल्ह्यात मुुसंडी मारली आहे. तर तो पुन्हा मिळविण्यासाठी आघाडीचा प्रयत्न सुरू आहे. शहर- जिल्ह्यात प्रचारासाठी भाजप- शिवसेनेने राष्ट्रीय नेत्यांची फळीच मैदानात उतरविली आहे तर, आघाडीचे विविध नेतेही मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सभांचा धडाका लावला आहे. तर, अन्य घटक पक्षही त्यांची व्होट बॅंक निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. बंडखोरीचा काही ठिकाणी उपद्रव झाला असल्यामुळे तेथे तिरंगी, चौरंगी लढती झाल्या आहेत. प्रचाराचा शनिवार (ता. 19) हा शेवटचा दिवस आहे. अंतिम टप्प्यातील प्रचारावर हुकमत राखण्यासाठी आता खल सुरू झाला आहे.

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूडमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे येथे उमेदवार आहेत. विरोधकांनी एकत्र येऊन मनसेचे किशोर शिंदे यांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे धास्तावलेल्या भाजपने विशेष यंत्रणा कोथरूडमध्ये कार्यान्वित केली आहे. तर, कसब्यात खासदार गिरीश बापट यांच्या बालेकिल्ल्यात महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोर कॉंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी जोरदार प्रचार करून लढत तिरंगी केली आहे. कॅंटोन्मेंटमध्ये भाजपच्या सुनील कांबळे यांना कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे तेथेही विशेष यंत्रणा भाजपने लावली आहे. हडपसरमध्ये भाजपच्या योगेश टिळेकर यांच्यासमोर राष्ट्रवादीचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांनी आव्हान निर्माण केले आहे. मतविभागणी तेथील निकाल अवलंबून असेल, असे सध्याचे चित्र आहे. पर्वती, खडकवासला, वडगावशेरी, शिवाजीनगरमध्ये सरळ लढतीची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासमोर कॉंग्रेसचे संजय जगताप आणि भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी आव्हान निर्माण केले आहे. तर, बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांची आणि इंदापूरमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील यांची लढत चर्चेची झाली आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार आशा बुचके यांचा विद्यमान आमदारांवर मात करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. येथील मतविभागणी निर्णायक ठरेल. भोर, खेडमध्येही तिरंगी लढत आहे. तर आंबेगाव, शिरूरमध्ये सरळ लढत आहे.

चिंचवडमध्ये भाजपमध्ये लक्ष्मण जगताप यांना आव्हान देत असलेले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. त्यांमुळे या लढतीबद्दल औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. तर पिंपरी आणि भोसरीमध्ये सरळ लढतीबद्दल कुतूहल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress NCP tough fight to BJP Shivsena alliance in Pune for Maharashtra Vidhan Sabha 2019