

अहंकार बाजूला ठेवा, अहवालाची दखल घ्या
‘एनटीए’मधील सुधारणांवरून काँग्रेसची टीका
नवी दिल्ली, ता. ११ (पीटीआय) : राष्ट्रीय चाचणी संस्थेतील (एनटीए) आणि शिक्षण मंत्रालयातील गंभीर अकार्यक्षमता व गैरप्रकार संसदीय समितीच्या अहवालातून समोर आले आहेत. उर्वरित मर्यादित काळात तरी मोदी सरकारने अहंकार बाजूला ठेवून या अहवालाची गंभीर दखल घ्यावी, अशी टीका काँग्रेसने आज केली.
काँग्रेसचे राज्यसभा सदस्य मुकुल वासनक यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीने शिक्षणावरील अहवाल सादर केला. राष्ट्रीय चाचणी संस्थेतील सुधारणा आणि सबलीकरण असे या अहवालाचे शीर्षक असून, हा अहवाल नऊ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आला. या अहवालाचा दाखला देत काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यम विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी ''एक्स''वरील पोस्टमध्ये केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘एनटीए’ची २०१७ मध्ये स्थापना झाली आणि तेव्हापासून या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या कोणत्याही परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, असा दावा शिक्षण मंत्रालयाने समितीसमोर केला होता. हा दावा ‘उघडपणे खोटा’ आहे, असे रमेश यांनी म्हटले आहे. अहवालातील प्रमुख मुद्दे मांडताना रमेश यांनी सांगितले की, २०१७ मध्ये एनटीएची स्थापना झाल्यापासून २०२५ पर्यंत संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या कोणत्याही परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, असा ‘उघडपणे खोटा आणि धाडसी दावा’ शिक्षण मंत्रालयाने संसदीय समितीसमोर केला. ‘‘एनटीएमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटणे आणि अनियमिततेच्या नऊ घटना घडल्याचे माहीत आहेत. शिक्षण मंत्रालय चुकाच मान्य करण्यास नकार देते, तेव्हा निष्पक्ष चौकशी आणि जबाबदारी निश्चित होण्याची अपेक्षा तरी कशी करायची?’’ असा सवाल रमेश यांनी केला.
रमेश यांचे प्रमुख आरोप
- ‘एनटीए’मध्ये ३९ पदे मंजूर असून, परीक्षांच्या आयोजनासाठी खासगी कंत्राटदारांवर अवलंबित्व
- मंजूर ३९ पदांपैकी २३ पदांवरच अधिकारी कार्यरत, राधाकृष्णन समितीची शिफारस दुर्लक्षित
- प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांमध्ये आवश्यक तज्ज्ञता, अनुभव विकसित होत नाही
- ‘एनटीए’ची रचना पारदर्शक नसून, त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटविणाऱ्या टोळ्यांना वाव मिळतो
- प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाई, वाहतूक, व्यवस्थापन आणि परीक्षा आयोजनामध्ये अपयशी ठरणाऱ्या कंपन्यांची काळी यादी तयार करण्याच्या शिफारशींकडे दुर्लक्ष
- निकालांबाबत पारदर्शकतेचा अभाव आणि परीक्षा केंद्रनिहाय माहिती उपलब्ध नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.