सततच्या घरफोडी, जबरी चोरीच्या घटनांमुळे पुणेकर बेजार; व्यापाऱ्यांचही वाढलं टेन्शन!

Crime_Burglary
Crime_Burglary

पुणे : सदाशिव पेठेतील विजयानगर परिसरातील आशुतोष गांधी यांच्या बंद सदनिकेचे कुलूप उचकटून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि एक लाख 58 हजाराची रोकड असा सहा लाख 31 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच पद्धतीने कधी सदनिका, तर कधी दुकाने फोडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी घरफोडी, चोरी, जबरी चोरी, दरोड्याच्या घटनांचे प्रमाण निम्म्याने कमी झाले आहे. असे असले तरीही यावर्षीच्या जून आणि जुलै महिन्यांमध्ये चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, व्यावसायिक, व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. 

कोरोनामुळे शहरात तीन ते चार महिने लॉकडाऊन असल्यामुळे या काळात विविध प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या कमी झाली. मात्र जून महिन्यापासून लॉकडाऊन जसजसा शिथील होत गेला, तसतशा किरकोळ मारहाणीपासून ते खुनापर्यंतच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत गेल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे त्याच मार्च ते जून अखेरपर्यंत शांत असलेले गुन्हेगार जून महिन्यापासून सक्रिय होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये दरोडा, घरफोडी, चोरी, जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडत गेल्याचे चित्र होते. 

मागील वर्षी मार्च ते ऑगस्ट या कालवधीमध्ये घरफोडीच्या 293, जबरी चोरीच्या 25 तर चोरीच्या 1959 इतक्‍या घटना घडल्या होत्या. यावर्षीच्या मार्च ते ऑगस्टच्या कालावधीमध्ये घरफोडीच्या 160, जबरी चोरीच्या 71 आणि चोरीच्या 803 घटना घडल्या आहेत. मागील वर्षीपेक्षा हे प्रमाण निम्म्याने कमी आहे. मात्र मार्च महिन्यात अत्यल्प, तर एप्रिल महिन्यात घरफोडीच्या 25 आणि मे महिन्यात 51 घटना घडल्या. त्यानंतर जूनमध्ये 112 आणि जुलैमध्ये 135 अशा घरफोडीच्या दुप्पट घटना घडण्यास सुरूवात झाली. बंद सदनिका, घरे आणि दुकानांना लक्ष्य केले जात आहे. एका रात्रीतच चार-पाच सदनिका किंवा पाच-सहा दुकाने फोडण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याची सद्यस्थिती आहे.

जानेवारी ते ऑगस्ट 2019 या कालावधीत घडलेल्या गुन्ह्यांची जानेवारी ते ऑगस्ट (ता.14) 2020 यावर्षीच्या गुन्ह्यांची तुलना केल्या, सर्वच गुन्ह्यांमध्ये 44 टक्के इतकी घट झाल्याचे चित्र आहे. घरफोडीसारख्या मालमत्तेच्या गुन्ह्यांचे प्रमाण 57 टक्‍क्‍यांनी घटले आहेत. लॉकडाऊनमध्ये नागरीक घरी असणे, पोलिसांकडून गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष्य ठेवणे तसेच सराईत गुन्हेगारांना अटक करणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या कालावधीत मालमत्तेबाबतच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.''
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त (गुन्हे) 

"लॉकडाऊनमध्ये गावी गेलेल्या नागरीकांची घरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात दर दिवशी चोरीच्या घटना घडत आहे. बंद सदनिका, घरेच नाहीत, तर चोरट्यांकडून चार ते पाच दुकाने एकाच रात्रीत फोडण्याचे प्रकारही घडत आहेत. लॉकडाऊननंतर नागरीक आणि व्यापारी आत्ता कुठे पूर्वपदावर येऊ लागले असतानाच अशा घटनांचा फटका त्यांना बसत आहे.''
- किशोर भोसले, नागरीक. 

जून आणि जुलैमध्ये घरफोडी, जबरी चोरीच्या घटना सतत घडण्याची कारणे - 
- लॉकडाऊनमध्ये गावी गेलेले नागरीक अद्याप परतले नाहीत. 
- गावी गेलेल्या नागरीकांची बंद घरे आणि सदनिका हेरून चोरट्यांकडून लक्ष्य 
- पोलिसांचा रस्त्यावरील बंदोबस्त आणि वावर कमी झाल्याने चोरटे सक्रिय 
- कोरोनामुळे कारागृहातून किरकोळ गुन्ह्यातील कैद्यांना सोडणे 

घरफोडी, जबरी चारी, दरोडा व चोरीचे गुन्हे :

गुन्ह्यांचे प्रकार 2019 (मार्च-ऑगस्ट) 2020(मार्च-14ऑगस्ट)
दरोडा 14 03 
जबरी चोरी 125 71 
घरफोडी 293 160 
चोरी 1959 803 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com