
Pune News : ग्राहक पंचायतीच्या कामामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यात यश आले
मंचर : “अखिल भारतीय ग्राहक पंचायत नेहमीच राजकारणापासून अलिप्त आहे. ग्राहकपंचायत कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान घेत नाही. तोडफोड आंदोलन न करता शांतता मार्गाने ग्राहक संरक्षण कायदा संसदेत मंजूर करून आणण्याचे काम केले आहे.
त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना आळा बसला असून सामान्य ग्राहकांना त्यांचे हक्क प्राप्त होण्यास मदत झाली आहे.” असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी सांगितले.
पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव) येथील श्रीराम विद्यालयात आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ग्राहक व हक्क’ या विषयावर औटी बोलत होते. यावेळी आंबेगाव तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी, ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, ज्ञानेश्वर उंडे, देविदास काळे, सुभाष मावकर, संतोष बांगर, प्राचार्य जगन्नाथ टेके उपस्थित होते. औटी व जोशी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
औटी म्हणाले “सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माणसाला क्षणाक्षणाला ग्राहक म्हणून वावरावे लागते. आपण कोणतीही वस्तू खरेदी करताना वजन, उत्पादित तारीख व त्यावरील तपशील बारकाईने पाहावा. विशेषतः अन्न पदार्थ खरेदी करतना अधिक काळजी घ्यावी. प्रत्येक विद्यालय व महाविद्यालयात ग्राहक पंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम राबविली जाईल.”
अशोक भोर म्हणाले “ बाळासाहेब औटी यांनी ग्राहक जागृतीसाठी केलेल्या कामाची देश पातळींवर दाखल घेण्यात आली. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. वस्तू खरेदी करताना त्याची पावती घेणे हा ग्राहकाचा हक्क आहे. ग्राहक न्यायालयात जाताना स्वतःची बाजू स्वतः माडु शकतो. येथे वकील देण्याची गरज नाही.” ऊंडे, टेके यांनी मार्गदर्शन केले.
पिंपळगाव-खडकी (ता.आंबेगाव) : श्रीराम विद्यालयात ग्राहक पंचायतीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्राहक व हक्क’ या विषयावर बोलताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी व अन्य.