agn Coop Taware PC 25062026_txt.txt

agn Coop Taware PC 25062026_txt.txt
Published on

बारा हजार सोसायट्यांचे
संगणकीकरण पूर्ण

सहकार आयुक्त तावरे ः २९ जूनपासून सहकार सप्ताह

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे राज्यातील १२ हजार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांचे (पॅक्स) संगणकीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे राज्याच्या सहकार क्षेत्राने २९ जून ते ६ जुलैदरम्यान सहकार सप्ताह आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने गुरुवारी (ता. २५) सहकार आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे तसेच सहकार क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.
तावरे म्हणाले, ‘‘केंद्राने देशभरातून संगणकीकरणासाठी निवडलेल्या ६७ हजारांपैकी १२ हजार सोसायट्या राज्यातील होत्या. हॉर्डवेअर, सॉफ्टवेअर तसेच प्रशिक्षणासह या सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर या सोसायट्यांचे ऑनलाइन लेखापरीक्षणदेखील पार पडले आहे. सोसायट्यांना पतपुरवठ्याच्या कामाव्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्रोत मिळण्यासाठी व्यवसायाभिमुख केले जात आहे. यातून अनेक सोसायट्या आता कृषिपूरक व्यवसाय, प्रक्रिया, साठवण तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रांसारख्या सेवा क्षेत्रात उतरल्या आहेत. अर्थात, राज्यातील ५० टक्के अद्यापही आर्थिक सोसायट्या आहेत. त्यांना सक्षम होण्यासाठी वेळ लागेल.’’
केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सहकाराचा विस्तार होत असल्याचे निरीक्षण नोंदविताना तावरे म्हणाले, ‘‘केंद्रात सहकार मंत्रालय तयार होताच अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु, सहकाराचे अनेक विषय सोडविण्यासाठी केंद्राकडून उल्लेखनीय काम होत असल्याचे मी जवळून बघतो आहे. काही राज्यांपुरती मर्यादित असलेली चळवळ आता ईशान्य भारतापर्यंत गेली आहे. राज्यातील पॅक्स, साखर उद्योग, जिल्हा बॅंका तसेच इतर सहकार क्षेत्राशी संबंधित संस्थांच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय बारकाईने काम करते आहे.’’
सहकारच्या बळकटीकरणासाठी देशभरातून सूचना मागविण्याबाबत केंद्रीय सहकार मंत्रालयाने उपक्रम राबवावा, असा प्रस्ताव केंद्राला पाठविला जाईल, असे अनास्कर यांनी सांगितले. ‘‘राज्यातील सहकाराचा उगम व वाटचालीची महती सांगणाऱ्या एका माहितीपटाची निर्मिती केली जाणार आहे. तसेच सहकाराची मराठी व हिंदी भाषेतील एक प्रार्थना तयार होणार आहे. याशिवाय शिखर बॅंकेत सहकार क्षेत्राचे एक कलादालनदेखील निर्माण केले जाईल,’’ असे अनास्कर यांनी स्पष्ट केले.
दुर्गाडे म्हणाले, की सहकार सप्ताहाच्या निमित्ताने पुणे जिल्हा बॅंकेकडून शारदा ग्रंथालय उभारणीचा उपक्रम राबविला जाईल. तसेच राज्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या भविष्यातील वाटचालींवर दस्तावेज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चौकट ----
तीन गोदामांचे उद्‍घाटन होणार
‘‘सहकार म्हणजे केवळ राजकारण नाही. ग्रामीण भागातील विकासासाठी सामूहिकपणे चाललेली ही चळवळ आहे,’’ असे मत सहकार आयुक्त तावरे यांनी नोंदविले. राज्यातील विविध कार्यकारी सोसायट्या आता वेगाने नव्या व्यवसायांमध्ये उतरत आहेत. पुणे, अमरावती, गडचिरोली येथील सोसायट्यांनी बांधलेल्या गोदामांचे ऑनलाइन उद्‌घाटन सहा जुलैला होईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com