Pune : महापालिका आणि पाटबंधारे साधणार कामात समन्वय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

महापालिका आणि पाटबंधारे साधणार कामात समन्वय

पुणे : महापालिकेकडून केला जाणाऱ्या पाणी वापर असो की नदीपात्रात काम याबाबत महापालिका आणि पाटबंधारे यांच्यात पत्राद्वारे कायम एकमेकांना प्रत्युत्तर दिले जाते. बैठकांमध्ये कामकाजावर आक्षेपही घेतले जातात. मात्र, आता दोन्ही विभागांमध्ये समन्वय ठेवून प्रश्‍न सोडविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही विभागातील कार्यकारी अभियंत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे शहराची वाढती तहान यामुळे करारापेक्षा जास्त पाणी महापालिकेला धरणातून उचलावे लागते. महापालिकेने पाणी जास्त घेतले की सिंचनासाठी पाणी देताना पाणीसाठ्याचे नियोजन बिघडत असल्याचा दावा पाटबंधारे विभागाकडून केला जातो. त्यामुळे पाटबंधारे विभागाने गेल्याच महिन्यात महापालिकेला पाणी वापर कमी करा अन्यथा उन्हाळ्यात पाणी टंचाई झाल्यास त्यास महापालिकाच जबाबदार असेल असे पत्र पाठवले होते. त्याच प्रमाणे महापालिकेने मुळामुठा नदीच्या सुशोभिकरणासाठी तब्ब्ल ५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प मजूर केला आहे. त्याचा पहिला ३५० कोटीचा टप्पा संगमवाडी ते बंडगार्डन पूल या दरम्यान राबविला जाणार आहे. याची निविदा मागविण्यात आली आहे. हा प्रकल्प राबविताना महापालिकेतर्फे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जाणार आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली होती. त्यावर देखील पाटबंधारे विभागाने महापालिकेला नोटीस बजावली आहे.

पाटबंधारे विभागाकडून पुणे महापालिकेला नेहमीच पाणी वापर कमी करा म्हणून सुनावले जाते. शिवाय अतिरिक्त पाणी वापराचा दंडपाटबंधारे समन्वय भरा म्हणून नेहमीच पत्र देखील पाठवले जातात. शिवाय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाटबंधारे कडून महापालिकेबाबत नेहमीच तक्रार केली जाते. मात्र आता पाटबंधारे विभाग महापालिका प्रशासनासोबत समन्वय साधणार आहे. कारण महापालिकेलाच या समन्वयाची आवश्यकता आहे. विविध कामे मार्गी लावण्यासाठी ५ लोकांची एक समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये महापालिका आणि पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: दिपावली उत्‍सव साध्या पध्दतीने साजरा करा - जिल्हाधिकारी डाॅ. विपीन

पाणी पुरवठा असो की इतर कोणतेही कामे करताना दोन्ही संस्थांमध्ये समन्वय असावा, एकमेकांबद्दल गैरसमज असू नये यासाठी समिती स्थापन केली आहे. या कक्षामार्फत पाटबंधारे विभागाशी निगडीत असलेल्या मर्व कामांमाठी प्रस्ताव तयार करुन सादर करणे, वेळोवेळी पाठपुरावा करणे, कागदपत्रांची पूर्तता अशी कामे पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत केली जाणार आहेत.

‘‘पाटबंधारे खात्याच्या जागेत काम करताना त्यांच्याशी समन्वय असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेतील कार्यकारी अभियंता व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची समिती गठीत केली आहे. या समितीच्या कामकाजाचे मला माहिती देणे आवश्‍यक आहे.’’

डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

अशी असेल समिती

अमर शिंदे कार्यकारी अभियंता (पथ)

राजेश बनकर कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा)

विपिन शिंदे कार्यकारी अभियंता (बांधकाम)

विजय पाटील कार्यकारी अभियंता (जलसंपदा)

जयवंत पवार उपअभियंता (मालमत्ता व्यवस्थापन)

loading image
go to top