रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी तरुणांची ऑनलाईन दुनियादारी

रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी तरुणांची ऑनलाईन दुनियादारी

पुणे : सोशल मीडियाच्या फायदे-तोटे या विषयावर बऱ्याचदा बोलले जाते पण हाच सोशल मीडिया आज महाराष्ट्रभरातील रुग्णांसाठी एक वरदान ठरत आहे. त्याचं कारण आहे रुग्णांच्या मदतीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवली जाणारी मोहीम 'सपोर्ट फॉर कोव्हिड पेशंट्स'!

दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा कोरोना सर्व महाराष्ट्रभर आपला विळखा अधिकच घट्ट करत होता त्यावेळी वैयक्तिक स्तरावर या तरुणांपैकी बऱ्याच जणांनी रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या त्यांच्या विभागात मदत करायला सुरुवात केली होती. पण आपल्या हाती सोशल मीडियाचंही एक शस्त्र आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी याच माध्यमातून एकत्र येत आपली एक टीम करायचं ठरवलं. सुरुवातीला महाराष्ट्रभरातून आधी ५ जण मग अजून ५ जण असं करत करत आता ७५ जणांची टीम जमली आहे आणि या प्रत्येकाच्या पाठी कितीतरी अज्ञात हात आहेत जे या टीमला मदत करत आहेत.

एखादी केस या टीमकडे आली की टीम ऍक्टीव्हेट होते. त्या त्या विभागात असणारे प्रत्येकाचे संपर्क पडताळून बघितले जातात आणि आपापल्या संपर्कामधल्या माणसांना त्या पेशंटला नेमकी काय मदत हवी आहे हे सांगितलं जातं. मग त्या त्या विभागातले बरेच जण त्या नेमक्या गोष्टीच्या मागे लागतात. त्यातून हॉस्पिटलचे, त्या त्या विभागात काम करणाऱ्या लोकांचे बरेच नंबर मिळतात, मग टीमकडून ते नंबर पुन्हा क्रॉस चेक केले जातात, जर एखादा संपर्क खरा निघाला तर त्यांना मदतीचे आवाहन करण्यात येते. एप्रिलच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या मोहिमेने आत्तापर्यंत ३०० रुग्णांना मदत केली आहे.

या टीमकडून रुग्णांना बेड्स मिळवून देणे, ज्या भागात इंजेक्शने मिळत नाहीयेत त्या भागातील प्रशासनाशी संपर्क साधून इंजेक्शने आणि औषधे मिळवून देणे, आपल्या ओळखीतून प्लाझ्मा दाता मिळवून देणे यव तीन गोष्टींसाठी प्रयत्न केले जातात. त्याचसोबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि गेल्या २-४ महिन्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मा दानासाठी आवाहन करणे यावर देखील भर दिला जातो.

रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी तरुणांची ऑनलाईन दुनियादारी
नियमभंग केल्याने पुणे मार्केट यार्डातील किराणा दुकानांवर कारवाई

खरंतर सुरुवातीला जेव्हा रुग्णसंख्या कमी होती तेव्हा पटकन मदत मिळत होती; पण आता रुग्णांची संख्याच इतकी वाढली आहे की कधीकधी मदत मिळवण्यात अपयश येतं, मदत मिळण्याआधीच रुग्ण दगावतो. पण तरीही हार न मानता दोन क्षण शांत होऊन तिसऱ्या क्षणाला लगेच नव्या पेशंटसाठी फोनाफोनी सुरू होते. पण आता काही हॉस्पिटलकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, काही हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्षात बेड असूनही फोनवर बेड उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं. काही हॉस्पिटलमधून फोनच उचलले जात नाहीत. प्लाझ्मा दानासाठी दाते भेटत नाहीत. अगदी सरकारी माध्यमातून अमुक ठिकाणी इंजेक्शन मिळेल असं सांगण्यात आलं तरीही तिथे गेल्यावर इंजेक्शन उपलब्ध नसतं. या आणि अशा बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊनही ही टीम कधीच हार मानत नाही. कोणालाही मदतीचा शब्द देत नाही, पण टीममधला प्रत्येक जण प्रत्येक रुग्णासाठी शक्य असेल त्याहून जास्त प्रयत्न करतो.

या टीमची संस्थापिका कल्याणी संध्या अंकुश हिच्याशी बोलत असताना ती म्हणाली, "मला तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाही काहीतरी सांगायचं आहे. रुग्णांची संख्या इतकी वाढत जात आहे की सध्याची परिस्थिती सांभाळताना प्रशासनाला आपण सहकार्य करण्याची आणि साथ देण्याची गरज आहे. कोरोनाशी चाललेली ही लढाई आता केवळ कोरोना योद्ध्यांची न राहता जनसामान्यांची लोकचळवळ व्हायला हवी आहे. १८ ते ४५ वयोगटातील लोकांसाठीही आता शासनातर्फे कोव्हिड लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी तरुणांची ऑनलाईन दुनियादारी
मुकबधीर कोरोनाबाधितांशी संवाद सोपा होण्यासाठी उपयुक्त चित्रफीत

पण त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत रक्त आणि प्लाझ्माचा तुटवडा जाणवणार आहे. म्हणून लस घेण्याआधी आपण सर्वप्रथम रक्त दान करावे आणि गेल्या ३-४ महिन्यात कोरोनातून बरा झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यायला हवे. असे झाले तर आणि तरच आपण या नव्या समस्या रोखू शकतो आणि कोरोनाला थोपवू शकतो. आणि आपण कोरोनाला रोखणारच आहोत, हे युद्ध जिंकणारच आहोत."

या टीममध्ये कल्याणी संध्या अंकुश, सर्वेश शरद जोशी, किरण तांबे, वृषभ अहिरे, जितेंद्र अहिरे, सुनील चव्हाण, निलेश पेठकर, पूजा भडांगे, प्रज्वली नाईक, नम्रता पाटील, अमृता मोरे, नितीन बोडके, अमित मरकड, मोहसीन शेख, योगेश जगताप, शर्वरी मुनीश्वर आणि त्यांची मित्रमंडळी काम करत आहेत. तसेच प्लाझ्मा विषयक कामात त्यांना ऋषी साबळे, राहुल साळवे आणि गौरव वाघ हे पाठबळ देत आहेत. तर सायली कुलकर्णी, चेतन शिवाजीराव पवार आणि मीनाक्षी तोरणे इत्यादी डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com