esakal | डोर्लेवाडी गावात कोरोनाचा विस्फोट; सरपंचांच्या असहकाराने गावकरी नाराज

बोलून बातमी शोधा

dorlewadi.

बारामती तालुक्यातील हॉटस्पॉट असलेल्या डोर्लेवाडी गावात आज कोरोनाचा विस्फोट झालेला पहायला मिळाला. 

डोर्लेवाडी गावात कोरोनाचा विस्फोट; सरपंचांच्या असहकाराने गावकरी नाराज
sakal_logo
By
सोमनाथ भिले

डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील हॉटस्पॉट असलेल्या डोर्लेवाडी गावात आज कोरोनाचा विस्फोट झालेला पहायला मिळाला. आज एंटेजेन तपासणी शिबिरात घेतलेल्या २२८ नमुन्यांपैकी तब्बल ३१ नागरिक कोरोनाबधित आढळल्याने गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात एकाच दिवशी ११ व एकाच कुटुंबातील ८ रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले होते. राज्य शासनाने २ दिवसांचा विकेंड लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र डोर्लेवाडी गावाने शनिवार पासून सलग ८ दिवस गावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात सर्वत्र धुरळणी व सॅनिटायझर करण्यात आले आहे.शिवाय आज प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना ऐंटीजन तपासणी शिबीर आयोजित केले होते. सकाळी आशा सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी कार्यकर्ती ग्रामपंचायत सदस्य  व सामाजिक कार्यकर्ते यांनी संपूर्ण गावात घरोघरी जाऊन  सर्व्हे करून संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी जागृती केली.

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​

ग्रामस्थांनी या शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद दिला.३०० हून अधिक नागरिक स्वयंस्फूर्तीने तपासणी केंद्रावर हजर होते. मात्र तपासणी किट शिल्लक नसल्याने २२८ नागरिकांची तपासणी करण्यात आली,त्यामध्ये ३१ रुग्ण कोरोना बाधित आढळले. त्यांना पुढील उपचारासाठी माळेगाव येथे ठेवण्यात आले आहे. गावातील बाधित रुग्णांचा आकडा भीतीदायक असून अजून तपासणी करण्याची गरज असल्याचे मत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बापूराव दडस यांनी व्यक्त केले.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरपंचांचा असहकार....

गावात कोरोनाबधित रुग्णांचे प्रमाण जास्त आढळून आल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक नवले व रमेश मोरे यांनी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना विना मास्क व्यक्तींवर कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यांनी तातडीने गावात पोलीस फौजफाटा पाठवून देऊन कारवाईस सुरुवातही केली मात्र सरपंच यांनी आलेले पोलीस कर्मचारी यांना कारवाई करू न देता अक्षरशः हुसकावून लावले. दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात शिबीराचे नियोजन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित केली होती. त्यालाही ते उपस्थित राहिले नव्हते. शिवाय आजही ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक  हे तपासणी शिबिरासाठी झटत असताना सरपंचांची उपस्थिती जाणवली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.