बारामतीकर 'या' आवाजाने होतात अस्वस्थ...

मिलिंद संगई
Thursday, 10 September 2020

लॉकडाऊनमुळे शहरात असलेली नीरव शांतता आणि त्या शांततेच्या पार्श्वभूमीवर सध्या बारामतीत एक आवाज घुमतोय...आणि हा आवाजच बारामतीकरांना कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. 

बारामती : लॉकडाऊनमुळे शहरात असलेली नीरव शांतता आणि त्या शांततेच्या पार्श्वभूमीवर सध्या बारामतीत एक आवाज घुमतोय...आणि हा आवाजच बारामतीकरांना कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचे संकट जसे वाढू लागले तसे बारामती शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले गेले. दररोज शंभरच्या वर रुग्ण सापडू लागल्याने शहर लॉकडाऊन करावे असा सूर समाजातून उमटला आणि प्रशासनाने त्याची दखल घेत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. 

मात्र सोमवारपासून सगळे व्यवहारच बंद असल्याने शहरात एक नीरव शांतता अनुभवली जात होती. त्या शांततेच्या पार्श्वभूमीवर बारामतीत एक आवाज सातत्याने घुमतोय आणि तो आहे रुग्णवाहिकेच्या सायरनचा....एका पाठोपाठ एक रुग्ण एका दवाखान्यातून दुस-या दवाखान्यात हलविण्याचे काम सुरु आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णांना तातडीने दवाखान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम रुग्णवाहिकेचे चालक करताना दिसतात, हे दिलासादायक असले तरी या सायरनच्या आवाजाने एक प्रकारची अस्वस्थता बारामतीकरांमध्ये जाणवत आहे. 

गेल्या अनेक वर्षात असा सायरन क्वचितच शहरात ऐकू यायचा, काही दुर्घटना घडली किंवा एखाद्या रुग्णाला तातडीने पुण्याला न्यायचे असल्यासच रुग्णवाहिका सायरन वाजवत जायची. कोरोनाची तीव्रता वाढू लागली तशी रुग्णवाहिकांची लगबग बारामतीत कमालीची वाढली आहे. केवळ लगबगच नाही, तर वेगाने वाहतूक करण्यासाठी सायरनचा केला जाणारा आवाज बारामतीकरांची धडधड वाढविणारा ठरत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एक रुग्णवाहिका जात नाही तो वर दुसरी रुग्णवाहिका सायरन वाजवत वेगाने धावत असल्याचे चित्र बारामतीत दैनंदिन झालेले आहे. लॉकडाऊनमुळे सध्या शहरात वेगळीच शांतता आहे, या शांततेत हा सायरनचा आवाज अधिकच घुमत असल्याने अनेक जण या आवाजाने अस्वस्थ होत आहेत. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection is on the rise in Baramati