पाटस येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोना संसर्ग

प्रफुल्ल भंडारी
Thursday, 19 November 2020

दौंड तालुक्यात पाटस येथील एकाच कुटुंबातील दहा सदस्यांसह एकूण पंधरा नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. 

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात पाटस येथील एकाच कुटुंबातील दहा सदस्यांसह एकूण पंधरा नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दौंडचे तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी या बाबत माहिती दिली. तालुक्यात ४६ जणांची  रॅपिड अँटिजेन डिटेक्शन किटद्वारे तपासणी केली असता त्यापैकी पंधरा जणांना बाधा झाल्याचा अहवाल आला. त्यामध्ये पाटस येथील एका कुटुंबातील काही लोक पुणे येथे गेले होते व त्यानंतर त्यांची तपासणी केली असता कुटुंबातील दहा सदस्यांना बाधा झाल्याचे निदान झाले आहे. वरवंड (ता. दौंड) येथे नातेवाईकांकडे आलेले पुरंदर तालुक्यातील चार नागरिक आणि बोरीबेल (ता. दौंड) येथील एका नागरिकाला देखील बाधा झाली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शारीरिक अंतराचे पालन, वैयक्तीक स्वच्छता, मास्कचा योग्य वापर आणि स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन डॅा. अशोक रासगे यांनी केले आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रूग्णालयात तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते १८ नोव्हेंबर या कालावधीत २९०८ नागरिकांना बाधा होऊन त्यापैकी २७७८ नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. ७३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील ३८, शहरातील १२ व राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) ०७ पोलिस, असे एकूण ५७ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection in ten members of the same family in Patas